Karun Nair याला अखेर संधी, ट्रिपल सेंच्युरी ठोकणाऱ्या फलंदाजाचं तब्बल 8 वर्षांनी कमबॅक

Team India Tour Of England 2025 : करुण नायर गेल्या अनेक वर्षांपासून कमबॅकच्या प्रतिक्षेत होता. करुणने देशांतर्गत क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केली. त्यामुळे करुणला 8 वर्षांनंतर संधी देण्यात आली आहे.

Karun Nair याला अखेर संधी, ट्रिपल सेंच्युरी ठोकणाऱ्या फलंदाजाचं तब्बल 8 वर्षांनी कमबॅक
Karun Nair Cricket
Image Credit source: PTI
| Updated on: May 24, 2025 | 5:18 PM

बीसीसीआयने इंग्लंड विरूद्ध खेळवण्यात येणाऱ्या 5 टेस्ट मॅचसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. टीम इंडिया शुबमन गिल याच्या नेतृत्वात इंग्लंड दौरा करणार आहे. या दौऱ्यासाठी एकूण 18 सदस्यीय संघ जाहीर केलाय. निवड समितीने या दौऱ्यासाठी अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आहे. तसेच एक असा खेळाडू आहे ज्याला तब्बल 8 वर्षांनंतर संधी देण्यात आली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर या खेळाडूने निवड समितीला संधी देण्यासाठी भाग पाडलं आहे. करुण नायर याला अखेर भारतीय संघात संधी मिळाली आहे.

8 वर्षांनी कमबॅक

अनुभवी करुण नायर याची अनेक वर्षांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. निवड समितीने करुणला अनेक वर्ष रखडवलं. मात्र करुणने हार न मानता सातत्याने रेड बॉल क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणं सोडलं नाही. त्याचंच फळ आता करुणला मिळालं आहे. करुणने अखेरचा कसोटी सामना हा मार्च 2017 साली खेळला होता. आता करुणची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे.

करुणला कमबॅक करण्याची संधी मिळणं ही त्याच्या कामगिरीची पोचपावती आहे. करुणच्या कमबॅकमुळे भारतीय क्रिकेटसाठी एका नवीन अध्यायाची सुरुवात देखील होऊ शकते. करुण नायरच्या कमबॅकचं सर्वात मोठं कारण म्हणजे विराट कोहली याची कसोटी निवृत्ती.आता विराटच्या अनुपस्थितीत टीम मॅनजेमेंटला त्या स्थानी खेळणारा सक्षम फलंदाज हवाय. करुण ती जागा भरुन काढू शकतो.

त्रिशतकी खेळी

करुण नायर याने 2016 साली इंग्लंड विरुद्ध चेन्नई येथे त्रिशतकं झळकावलं होतं. करुणने तेव्हा नाबाद 303 धावा केल्या होत्या. करुण वीरेंद्र सेहवाग याच्यानंतर टीम इंडियासाठी त्रिशतक करणारा पहिला फलंदाज आहे. मात्र करुणला गेल्या काही वर्षात अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. करुणला देशांतर्गत क्रिकेटमधील चांगल्या आणि सातत्यपूर्ण खेळीनंतरही भारतीय संघात स्थान मिळालं नाही. मात्र आता अनेक वर्षांनंतर करुणला संधी मिळालीय. त्यामुळे आता करुणने संधीचं सोन करावं आणि निवड समितीला दाखवून द्यावं, अशी अपेक्षा चाहत्यांना आहे.

डोमेस्टिक क्रिकेटमधील कामगिरी

करुणने गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी केली आहे. करुणने 2024-2025 या मोसमात रणजी आणि विजय हजारे ट्रॉफीत खोऱ्याने धावा केल्या. करुणने रणजी ट्रॉफीतील 9 सामन्यांमध्ये 863 रन्स केल्या. करुणने या दरम्यान 4 शतकं आणि 2 अर्धशतकं झळकावली. तसेच करुणने विजय हजारे ट्रॉफीतील 9 सामन्यांमध्ये 5 शतकांच्या मदतीने 779 रन्स केल्या. आता करुणचा इंग्लंड दौऱ्यात अशीच कामगिरी करण्याचा प्रयत्न असणार आहे.

दरम्यान करुण नायर याने टीम इंडियासाठी आतापर्यंत एकूण 6 कसोटी सामने खेळले आहेत. करुणने या 6 सामन्यांमध्ये 62.33 च्या सरासरीने 374 धावा केल्या आहेत. तसेच करुणने 2 वनडेत 23 च्या सरासरीने 46 रन्स केल्यात.