LLC 2024: लीजेंड्स लीगचं वेळापत्रक जाहीर, कार्तिक-धवन सज्ज, पहिला सामना केव्हा?

Legends League Cricket 2024 Schedule: लीजेंड्स लीग स्पर्धेतील तिसऱ्या पर्वाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या पर्वात एकूण 6 संघ सहभागी होणार आहेत. जाणून घ्या वेळापत्रक.

LLC 2024: लीजेंड्स लीगचं वेळापत्रक जाहीर, कार्तिक-धवन सज्ज, पहिला सामना केव्हा?
Legends League Cricket 2024 Schedule
| Updated on: Aug 28, 2024 | 8:54 PM

क्रिकेट वर्तुळातून या क्षणाची मोठी बातमी आली आहे. लीजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. एलएलसी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती दिली आहे. स्पर्धेतील सलामीचा सामना हा 20 सप्टेंबर रोजी होणार आहे. हा सामना हा जोधपूरमधील बरकतुल्लाह खान स्टेडियममध्ये होणार आहे. या स्पर्धेत एकूण 6 संघ सहभागी होणार आहेत. तर एकूण 25 सामने होणार आहेत. तर या तिसऱ्या हंगामातील अंतिम सामना हा 16 ऑक्टोरबरला श्रीनगर येथे होणार आहे.

स्पर्धेतील सामने जोधपूर, सूरत, जम्मू आणि श्रीनगर येथे होणार आहे. श्रीनगरमध्ये 40 वर्षांनंतर क्रिकेट सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत अनेक माजी क्रिकेटपटू चौकार षटकार ठोकताना दिसणार आहेत. या स्पर्धेत एकूण 6 संघांसाठी 200 पेक्षा अनेक खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेतील अंतिम सामना हा श्रीनगरमधील बख्शी स्टेडियममध्ये होणार आहे.

रमन रहेजा हे लीजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेचे सहसंस्थापक आहेत. रहेजा यांनी या तिसऱ्या पर्वाबाबत प्रतिक्रिया दिली. “आम्ही यंदा लीजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेचं काश्मीरमध्ये आयोजन करण्यासाठी उत्साहित आहोत. काश्मीरमधील चाहत्यांना या स्पर्धेनिमित्ताने आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंना पाहता येणार आहे. काश्मीरमधील चाहत्यांना जवळपास 40 वर्षांनंतर क्रिकेटचा थरार अनुभवता येणार आहे”, असं रहेजा यांनी म्हटलं.

दिग्गज पुन्हा मैदानात उतरणार

या स्पर्धेत विविध संघातील अनेक दिग्गज माजी क्रिकेटर खेळताना दिसणार आहेत. यामध्ये टीम इंडियाच्या सुरेश रैना, दिनेश कार्तिक, शिखर धवन आणि इतर खेळाडूंचा समावेश असणार आहे. तर एरॉन फिंच, मार्टिन गुप्टील, ख्रिस गेल, हाशिम अमला, रॉस टेलरसह इतर 110 खेळाडू असणार आहेत. आयपीएलच्या गत हंगामाचं आयोजन भारतात करण्यात आलं होतं. भारतात लीजेंड्स लीग स्पर्धेचं 2022 मध्ये 2 हंगामांचं आयोजन केलं गेलं होतं. वर्ल्ड जायंट्स पहिल्या पर्वातील विजेता संघ ठरला होता. जॅक कॅलिसच्या नेतृत्वात वर्ल्ड जायंट्सने ही कामगिरी केली होती. तर दुसर्‍या पर्वात इंडिया कॅपिटल्सने गौतम गंभीरच्या नेतृत्वात ट्रॉफी उंचावली होती.