34 चेंडूत 80 धावा करणाऱ्या क्लासेननं सांगितलं मुंबई इंडियन्सचं कुठे चुकलं? हार्दिक पांड्याला दाखवला आरसा

| Updated on: Mar 28, 2024 | 2:54 PM

आयपीएल चाहत्यांमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्याची जोरदार चर्चा रंगली आहे. या सामन्यात अनेक विक्रम रचले गेले. यापूर्वी आयपीएलमध्ये जे घडलं नाही ते घडलं. चौकार, षटकार आणि बरंच काही पाहायला मिळालं. यात क्लासेनची आक्रमक खेळी सर्वांच्या लक्षात राहण्यासारखी आहे. त्याने 34 चेंडूत 80 धावा केल्या. सामन्यानंतर त्याने मुंबई इंडियन्सचं काय चुकलं ते पण सांगितलं.

34 चेंडूत 80 धावा करणाऱ्या क्लासेननं सांगितलं मुंबई इंडियन्सचं कुठे चुकलं? हार्दिक पांड्याला दाखवला आरसा
Follow us on

आयपीएल 2024 स्पर्धेतील आठवा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मग काय सामना सुरु झाला आणि विक्रम रचण्याचा पाढा सुरु झाला. हैदराबादने 20 षटकात 3 गडी गमवून 277 धावा केल्या आणि विजयासाठी 278 धावांचं आव्हान दिलं. इतका मोठा स्कोअर चेस करणं कठीण होतं हे सर्वश्रूत आहे. पण मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी बऱ्यापैकी लढा देत 20 षटकात 5 गडी गमवून 246 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सवर 31 धावांनी विजय मिळवला. या विजयासह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. तर मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा पराभव असल्याने एकदम तळाशी पोहोचला आहे. या सामन्यात हेन्रिक क्लासेननं 34 चेंडूत 7 षटकार आणि 4 चौकाराच्या मदतीने नाबाद 80 धावा केल्या. सामन्यानंतर क्लासेननं मुंबई इंडियन्सचं काय चुकलं? ते देखील सांगितलं.

सामन्यानंतर ब्रॉडकास्टरशी बोलताना हेन्रिक क्लासेन म्हणाला की, “मुंबई इंडियन्सने आपल्या डावात एक मोठी चूक केली. त्यांनी पॉवरप्लेमध्ये सर्वोत्कृष्ट बॉलरला गोलंदाजी दिली नाही. हीच आमची योजना होती. जेव्हा सुरुवातीला इतक्या धावा झाल्या की नंतर मला बुमराहची गोलंदाजीचा सामना करताा काही त्रास झाला नाही. दबाव नसल्याने मी उत्तमरित्या खेळू शकलो.”

दुसरीकडे, सामन्यानंतर हार्दिक पांड्यानेही आपलं मत मांडलं, “नाणेफेकीचा कौल झाला तेव्हा हैदराबाद 277 धावा करेल याची कल्पना नव्हती. गोलंदाजी चांगली की वाईट हा प्रश्न नाही. त्यांनी खरंच खूप चांगली फलंदाजी केली. या विकेटवर दोन्ही बाजूने 500 धावा झाल्या. याचाच अर्थ की फलंदाजीसाठी ही विकेट चांगली होती. आमच्याकडे यंग बॉलिंग अटॅक आहे आणि यातून खूप काही शिकलो. क्वेना खरंच चांगला गोलंदाज आहे. त्याला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी काही वेळ लागेल.”

मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना 1 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. आतापर्यंत झालेल्या 8 सामन्यात होम ग्राउंडवर असलेल्या संघांना फायदा झाला आहे. आता मुंबईला याचा फायदा मिळतो की नाही? विजयाचं खातं खोलते की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.