IND vs NZ: विजय जवळपास निश्चित होता, पण कुठे चुकलं? पराभवानंतर मिचेल सँटनरने सांगितलं नेमकं कारण; कुणावर फोडलं खापर?
Mitchell Santner Statement New: दुसऱ्या टी-२० सामन्यात १५ व्या षटकात ११२ धावांत ६ गडी गमावूनही भारतीय संघाने पराभवाच्या उंबरठ्यावरून पुनरागमन करत एक शानदार विजय नोंदवला आहे.

क्राइस्टचर्चमधील हॅगली ओव्हलवर भारताकडून न्यूझीलंडला चार गडी राखून पराभव पत्करावा लागला. मात्र किवी कर्णधार मिचेल सँटनरने आपल्या फिरकी गोलंदाजीने महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला. सँटनरने सामन्यात चार बळी घेत भारताला बॅकफूटवर ढकलले. पण १८१ धावांचे लक्ष्य गाठताना भारतीय संघाच्या खालच्या फळीतील फलंदाजांनी सामन्याचे चित्रच पालटले. या पराभवानंतर न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने कबूल केले की भारतीय संघ खूप मजबूत आहे. शेवटच्या षटकांमध्ये तिलक वर्मा, नमन धीर आणि नितीश कुमार रेड्डी यांच्या संयमी फलंदाजीने न्यूझीलंडकडून विजय हिसकावून घेतला.
प्रथम फलंदाजी करताना किवी संघाने आपल्या निर्धारित २० षटकांत ५ गडी गमावून १८० धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ कोसळण्याच्या मार्गावर होता, पण अखेरीस युवा खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. अशाप्रकारे जेव्हा न्यूझीलंडचा विजय निश्चित वाटत होता, तेव्हा अखेरीस त्यांचा पराभव झाला. सामन्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर निराश दिसत होता. त्याने आपल्या संघाच्या पराभवासाठी क्षेत्ररक्षणातील किरकोळ चुका आणि एक सोडलेला झेल याला जबाबदार धरले.
सँटनर म्हणाला की, जर त्यांनी सर्व झेल घेतले असते, तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता. एका बलाढ्य संघाविरुद्ध छोट्या चुका महागात पडू शकतात. तिलक वर्मा, नमन धीर आणि अखेरीस नितीश कुमार रेड्डी यांनी खूप चांगली फलंदाजी केली. जर त्यांच्या संघाने शेवटी आणखी एक विकेट घेतली असती, तर सामना जवळजवळ संपलाच असता. भारतीय फलंदाजांनी दबावाखाली उत्कृष्ट नियंत्रण दाखवले. त्यांच्या दमदार खेळाने गोलंदाजांना चुका करण्यास भाग पाडले.
किवी कर्णधाराने विशेषतः क्षेत्ररक्षणातील चुका आणि मैदानावर गमावलेल्या संधींबद्दल नाराजी व्यक्त केली. सामन्यादरम्यान बेवन जेकब्सने मायकल ब्रेसवेलच्या गोलंदाजीवर युवा वैभव सूर्यवंशीचा एक सोपा झेल सोडला. त्यानंतर सँटनरचा राग कॅमेऱ्यात कैद झाला होता. मात्र जीवदान मिळाल्यानंतर वैभव फार काळ टिकला नाही. त्याने केवळ ४ धावा केल्या. महत्त्वाच्या क्षणी झेल सोडणे आणि मैदानावर सुस्तपणा दाखवणे हे आपल्या संघाला महागात पडले, असे सँटनर मानतात.
तत्पूर्वी, न्यूझीलंडने फलंदाजीची सुरुवात खराब केली. सुरुवातीलाच तीन विकेट गमावल्या. पण नंतर ग्लेन फिलिप्स (70) आणि बेवन जेकब्स यांनी डाव सावरला. संघाला 180 धावांच्या सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. सँटनरने आपल्या गोलंदाजीचे कौतुक केले. त्याने सांगितले की, गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांमध्ये चांगली कामगिरी केली, परंतु महत्त्वाच्या क्षणी झालेल्या छोट्या क्षेत्ररक्षणाच्या चुकांमुळे त्यांना सामना जिंकण्याची संधी गमवावी लागली. खेळाडूंचा कामाचा ताण लक्षात घेता, मालिकेतील आगामी सामन्यांमध्ये रोटेशन करण्याचे संकेतही त्याने दिले.
