बीसीसीआयच्या अध्यक्षपदी मिथुन मन्हास यांची नियुक्ती, जाणून घ्या त्यांच्याबाबत

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी मिथुन मन्हास यांची नियुक्ती झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या पदावर कोण असेल याची चर्चा सुरु होती. अखेर त्या चर्चांना पूर्णविराम लागला असून मिथुन मन्हास यांच्याकडे अध्यक्षपद असणार आहे.

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी मिथुन मन्हास यांची नियुक्ती, जाणून घ्या त्यांच्याबाबत
| Updated on: Sep 28, 2025 | 2:07 PM

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी मिथुन मन्हास यांची नियुक्ती झाली आहे. रॉजर बिन्नी यांनी निवृत्ती जाहीर केल्यानंतर हे पद रिक्त होतं. तसेच उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्या खांद्यावर कार्यभार होता. जम्मू क्रिकेट असोसिएशनची संबंधित माजी क्रिकेटपटू मिथुन मन्हास यांची वार्षिक सर्वसाधारण सभेत नियुक्ती करण्यात आली आहे.जम्मू काश्मीरच्या खेळाडूची या पदावर नियुक्ती होण्याची ही पहिलीच वेळ आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या बीसीसीआयच्या अनौपचारिक बैठकीनंतर मन्हास यांचे नाव पुढे आले होते. मन्हास यांच्या नियुक्तीमुळे बीसीसीआयच्या खेळाडू केंद्रित धोरणांना आणखी बळकटी मिळेल. तसेच तरुण क्रिकेटपटूंच्या विकासावर विशेष भर दिला जाईल अशी अपेक्षा आहे. दुसरीकडे, राजीव शुक्ला उपाध्यक्षपदी कायम असणार आहेत. देवजीत सैकिया सचिव, प्रभतेज सिंग भाटिया संयुक्त सचिव आणि रघुराम भट्ट खजिनदार असतील. दरम्यान, अरुण धुमाल हे आयपीएलचे चेअरमन असतील.

मिथुन मन्हास हे बीसीसीआयचे अध्यक्ष होणारे तिसरे क्रिकेटपटू आहेत. यापूर्वी सौरव गांगुली आणि रॉजर बिन्नी यांनी ही भूमिका बजावली आहे. रॉजर बिन्नी यांच्या जागी आता ते अध्यक्षपद भूषविणार आहे. रॉजर बिन्नी यांना वयोमर्यादेमुळे राजीनामा द्यावा लागला होता. मिथुन मन्हास यांची नियुक्ती झाल्यानंतर पहिल्यांदाच एका अनकॅप्ड खेळाडू बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवणार आहे.

मिथुन मन्हास यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी ट्विट करून मनहास यांचे अभिनंदन केले. जितेंद्र सिंह यांनी लिहिले, “मिथुन मन्हास यांना अधिकृतपणे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे नवे अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. जम्मू आणि काश्मीरच्या सर्वात दुर्गम जिल्ह्यांपैकी एक असलेल्या दोडासाठी हा दिवस किती महत्त्वपूर्ण कामगिरी आहे हे वर्णन करणे कठीण आहे. हा जिल्हा माझे जन्मस्थान देखील आहे. अवघ्या काही तासांच्या आत दोन प्रमुख बातम्या आल्या आहेत. प्रथम, किश्तवारची मुलगी शीतल विश्वविजेती म्हणून चमकते आणि त्यानंतर लवकरच, मिथुन या प्रतिष्ठित पदावर निवडले जातात.”

कोण आहेत मिथुन मन्हास?

मिथुन मन्हास हे 45 वर्षांचे असून दिल्लीसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळले आहेत. पण त्यांना भारतीय संघासाठी खेळण्याची संधी काही मिळाली नाही. क्रिकेट कारकिर्द स्थानिक संघ आणि आयपीएल पुरता मर्यादीत राहिली. मिथुन मन्हास 55 आयपीएल सामने खेळले असून 38 सामन्यात फलंदाजी केली आहे. यात त्यांनी 514 धावा केल्या आहेत. यात एकही शतक किंवा अर्धशतक नाही. दिल्ली डेअरडेविल्ड संघाकडून त्यांनी 2008 मध्ये पदार्पण केलं. तर चेन्नई सुपर किंग्सकडून 2014 मध्ये शेवटचा आयपीएल सामना खेळला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीकडून खेळताना मन्हास यांनी 157 सामन्यात 9714 धावा केल्या. यात 27 शतके आणि 49 अर्धशतकांचा समावेश आहे. 130 लिस्ट ए सामन्यात 45.84 च्या सरासरीने 4126 दावा केल्या आहेत. 91 टी20 सामन्यात 1170 धावा केल्यात. तर तिन्ही फॉर्मेटमध्ये त्यांच्या नावावर 70 विकेट्स आहेत.देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी प्रशिक्षक म्हणूनही कार्यभार सांभाळला आहे.