नवीन उल हक याने पुन्हा एकदा विराट कोहली याला डिवचलं! ‘त्या’ पोस्टमुळे पुन्हा एकदा जोरदार चर्चा

अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक याने पुन्हा एकदा एक पोस्ट केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्याने विराट कोहली याला डिवचल्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

नवीन उल हक याने पुन्हा एकदा विराट कोहली याला डिवचलं! त्या पोस्टमुळे पुन्हा एकदा जोरदार चर्चा
नवीन उल हक आणि विराट कोहलीमधील वाद काही संपेना! आता पुन्हा नवी पोस्ट चर्चेत
| Updated on: Jul 01, 2023 | 5:33 PM

मुंबई : अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक आणि विराट कोहली यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. आयपीएल 2023 स्पर्धेत हे दोन्ही खेळाडूंमध्ये जोरदार वाद झाला होता. लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्या रंगलेल्या सामन्यात खडाजंगी झाली होती. इतकंच काय तर विराट कोहली हात मिळवणी करण्यासाठी आला असता नवीन उल हकने तो झटकला होता. तेव्हा या वादात गौतम गंभीर याची एन्ट्री झाली आणि वाद विकोपाला गेला. त्यानंतर विराट आणि नवीन उल हक यांनी क्रिप्टिक पोस्ट शेअर करत एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न केला. आता नवीन उल हकने केलेली पोस्ट चर्चेत आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्याने विराट कोहली याला डिवचल्याचं बोललं जात आहे.

नवीन उल हक याने काय पोस्ट केली आहे

नवीन उल हक याने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट केली आहे. यात एका गोष्टीचा व्हिडीओ आहे. एक गाढव आणि वाघाची यात गोष्ट आहे. व्हिडीओच्या शेवटी असं लिहिलं आहे की, “मूर्खासोबत वाद घालणं म्हणजे वेळ फुकट घालवणं”

काय आहे गोष्टीत

गाढवाने वाघाला सांगितले की गवत निळे आहे. वाघाने स्पष्टपणे सांगितलं की गवत हिरवे आहे. चर्चेचं रुपांतर वादात झालं आणि दोघंही हा मुद्दा लवादाकडे घेऊन गेले. लवादाच्या भूमिकेत असलेल्या सिंहाने उत्तर दिले खरंच, गवत निळे आहे. यासाठी वाघाला 5 वर्ष मौन राहण्याची शिक्षा दिली गेली. या निर्णयानंतर गाढव आनंदाने उड्या मारत सांगितलं की, गवत निळे आहे.

वाघाने त्याची शिक्षा मान्य करत सिंहाला विचारले की, महाराज, तुम्ही मला शिक्षा का दिली, गवत हिरवे तर आहे?सिंहाने उत्तर दिले की,’खरं तर गवत हिरवंच आहे’. वाघाने विचारले की ‘मग मला शिक्षा का करताय?’

तेव्हा त्याने सांगितलं की, “वेळेचा सर्वात मोठा अपव्यय म्हणजे मूर्खांसोबत वाद घालणे. ते खरेपणाचा स्वीकार कधीच करत नाही. ते त्यांच्या भ्रमावर विश्वास ठेवतात. त्यामुळे अर्थहीन चर्चेत वेळ घालवू नये. त्यांना पुरावा देऊनही समज येत नाही. ते अहंकार, द्वेष आणि संतापाने आंधळे झालेले असतात. त्यांना फक्त आपण योग्य असल्याचं सिद्ध करायचं असतं. भले ते चुकीचे असले तरी”

विराट कोहली बाबत काय सांगितलं होतं

दोन दिवसांपूर्वी नवीन उल हकने बीबीसीला दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितलं होतं की, “सामन्यानंतर हात मिळवणी करताना मी विराट कोहलीला हात मिळवला आणि दुसऱ्या खेळाडूकडे जात होतो. पण तेव्हा त्याने माझा हात पकडला. तेव्हा मी उत्स्फुर्तपणे हात झटकला.”