Cricket : एका सामन्यात 3 Super Over, असा ठरला विजयी संघ
3 Super Over : सामना बरोबरीत राहिल्यानंतर वनडे आणि टी 20I क्रिकेटमध्ये सुपर ओव्हरनुसार विजेता संघ निश्चित होतो. मात्र या सामन्यात 2 वेळा सुपर ओव्हरही टाय झाली. त्यानंतर तिसऱ्या सुपर ओव्हरचा थरार क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळाला

स्कॉटलँडमधील ग्लासगो इथे टी 20 ट्राय सीरिजमधील एक सामना हा ऐतिहासिक ठरला. या सामन्यात नेपाळ विरुद्ध नेदरलँड्स आमनेसामने होते. हा सामना बरोबरीत सुटला. सामना बरोबरीत राहिल्यानंतर सुपर ओव्हरद्वारे विजयी संघ निश्चित होतो. मात्र नेदरलँड्स आणि नेपाळ यांच्यात सुपर ओव्हरही तब्बल 2 वेळा टाय झाली. तर तिसर्या सुपर ओव्हरनंतर अखेर विजयी संघ निश्चित झाला. तब्बल 2 वेळा सुपर ओव्हर झाल्याने कोणता संघ जिंकणार? याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना होती. मात्र अखेर तिसऱ्या सुपर ओव्हरनंतर विजयी संघ ठरला.
सामन्यात काय झालं?
नेदरलँड्सने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 152 धावा केल्या. नेपाळच्या फिरकी गोलंदाजांनी नेदरलँडला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखलं. संदीप लामिछाने आणि ललित राजबंशी या दोघांनी चिवट बॉलिंग केली. प्रत्युत्तरात नेपाळला 20 ओव्हरम्ये 8 विकेट्स गमावून 151 धावाच करता आल्या. नेपाळकडून नंदन यादव याने शेवटच्या बॉलवर फोर लगावला. त्यामुळे सामना शेवटच्या चेंडूनंतर सुपर ओव्हरमध्ये पोहचला.
पहिल्या सुपर ओव्हरचा थरार
नेपाळने पहिल्या सुपर ओव्हरमध्ये 19 धावा केल्या. नेदरलँड्सने प्रत्युत्तरात 19 धावा केल्या. त्यामुळे पहिली सुपर ओव्हर टाय झाली. त्यानंतर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्येही तिच स्थिती पाहायला मिळाली. दोन्ही संघांनी प्रत्येकी 17-17 धावा केल्या. त्यामुळे दुसरी सुपर ओव्हरही बरोबरीत राहिली. त्यामुळे आता कोण जिंकणार? याची उत्सुकता शिगेला पोहचली. तिसऱ्या सुपर ओव्हरमध्ये नेपाळला एकही धाव करता आली नाही. नेपाळने झिरोवर 2 विकेट्स गमावल्याने त्यांचा डाव आटोपला. त्यानंतर नेदरलँड्सने पहिल्याच बॉलवर सिक्स लगावला आणि सुपर ओव्हरच्या मालिकेला ब्रेक लावला.
नेदरलँड्सच्या तेजा निदामनुरु याने सर्वाधिक धावा केल्या. तेजाने 35 धावांचं योगदान दिलं. तर विक्रमजीत सिंह याने 30 धावांची खेळी केली. साकिब जुल्फिकार याने 25 रन्स केल्या. नेपाळसाठी संदीप लामिछाने याने तिघांना बाद केलं. नंदन यादव याने 2 विकेट्स मिळवल्या. तर कुशल भुर्टेल आणि राजभंशी या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
नेपाळसाठी कर्णधार रोहित पौडेल याने सर्वाधिक 48 धावा जोडल्या. कुशल भुर्टेल याने 34 रन्स केल्या. तर इतरांना 20 पार मजल मारता आली नाही. नेदरलँड्सकडून डॅनियल डोरम हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. डॅनियलने 4 ओव्हरमध्ये 14 रन्स देत तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. विक्रमजीत सिंह यानेही दोघांना बाद केलं. तर जॅक लायन-कॅशेट, बेन फ्लेचर आणि कायल क्लेन या त्रिकुटाने प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
