
भारत आणि श्रीलंका या दोन देशांकडे टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद आहे. ही स्पर्धा 7 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघांनी भाग घेतला असून जेतेपदासाठी कंबर कसली आहे. या स्पर्धेत काही विक्रम मोडले आणि नव्या रचले जाणार यात काही शंका नाही. या जेतेपदासाठी भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका, पाकिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज सारखे संघ दावा ठोकतात. तर इतर संघांना लिंबू टिंबू समजलं जातं. पण मागच्या काही वर्षात या लिंबू टिंबू समजल्या संघांनी मोठा उलटफेर केल्याचं दिसून आलं आहे. मोठ्या संघाचं स्पर्धेतील गणित बिघडवून टाकलं आहे. त्यामुळे मोठे संघ ताकही फुंकून पितात. भारताच्या गटात पाकिस्तान, नामिबिया, नेदरलँड आणि अमेरिका हे संघ आहे. यात भारत पाकिस्तान सहज पुढच्या फेरीत जातील असं वाटतं. पण तशी चूक करू नका. कारण ही दुबळ्या समजल्या जाणाऱ्या नेदरलँडच्या एक फलंदाजाने ऐतिहासिक विक्रम केला आहे.
नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने टी20 क्रिकेटमध्ये द्विशतकी खेळी केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या लोकल टी20 स्पर्धेत स्कॉट एडवर्ड्सने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. क्लेन्झो ग्रुप शील्ड स्पर्धेत अल्टोना स्पोर्ट्स टी20 फर्स्ट इलेव्हनकडून खेळताना स्कॉट एडवर्ड्सने वादळी खेळी केली. एडवर्ड्सने विल्यम्सच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला आणि फक्त 81 चेंडूत 229 धावा केल्या. पहिल्या चेंडूपासून त्याने आक्रमक खेळी केली. एडवर्ड्सने चौकारांपेक्षा जास्त षटकार मारले. त्याने 282 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. यात 23 षटकार आणि 14 चौकार मारले. पण हे द्विशतक अधिकृत रेकॉर्डमध्ये गणले जाणार नाही.
दरम्यान, ही स्पर्धा जरी स्थानिक असली तरी त्याचा फॉर्म खूपच महत्त्वाचा आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत त्याने असाच खेळ दाखवला तर एखाद्या संघाचं गणित बिघडू शकतं. त्यामुळे त्याला हलक्यात घेणं महागात पडू शकतं. कारण नेदरलँडने या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आणि पाकिस्तान किंवा भारताला पराभूत केलं. तर पुढच्या फेरीचं तिकीट मिळू शकतं. त्यामुळे क्रिकेट संघांना ताकही फुंकून पिण्याची गरज आहे. कधी कोण खेळेल काही सांगता येत नाही. अशा स्थितीत संघांना डोकं शांत ठेवून रणनिती पुढे नेण्याची गरज आहे.