दक्षिण अफ्रिकेचा उपांत्य फेरीत भारतामुळे पराभव? डेविड मिलरने असं ठरवलं दोषी
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने दक्षिण अफ्रिकेचा 50 धावांनी पराभव केला. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेचं उपांत्य फेरीतच आव्हान संपुष्टात आलं. या पराभवानंतर डेविड मिलरने आपला राग व्यक्त केला आहे.

दक्षिण अफ्रिकेच्या माथ्यावर चोकर हा शिक्का पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. बाद फेरीच्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेचं आव्हान पुन्हा एकदा संपुष्टात आलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने दक्षिण अफ्रिकेचा 50 धावांनी पराभव केला. खरं तर या सामन्यात न्यूझीलंडने विजयासाठी 362 धावांचं मोठं आव्हान दिलं होतं. पण हे आव्हान गाठताना दक्षिण अफ्रिकेचा संघ 312 धावांपर्यंत मजल मारू शकला. या पराभवानंतर उपांत्य फेरीत शतकी खेळी करणारा डेविड मिलर संतापला आहे. त्याने या पराभवाला आयसीसीला जबाबदार धरलं आहे. डेविड मिलरने स्पर्धेतून बाद होताच आयसीसीच्या प्रवास व्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली आहे. पाकिस्तानच्या यजमानपदाखाली आयोजित केलेली स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर खेळवली जात आहे. भारताचे सामने दुबई, तर इतर सर्व सामने पाकिस्तानात झाले. पण उपांत्य फेरीचं गणित भारत न्यूझीलंड सामना संपल्याशिवाय अशक्य होतं. त्यामुळे दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांना दुबईला जावं लागलं. . पण भारताच्या विजयामुळे दक्षिण अफ्रिकेला न्यूझीलंडसोबत पुन्हा एकदा पाकिस्तानात यावं लागलं. कारण उपांत्य फेरीचा दुसरा सामना लाहोरमध्ये खेळवला जाणार होता. त्यामुळे मिलर अतिरिक्त प्रवासामुळे चांगलाच वैतागलेला दिसला.
डेविड मिलरने सांगितलं की, ‘फ्लाइटची वेळ फक्त एक तास 40 मिनिटांची होती. पण हा प्रवास काही सोपा नव्हता. कारण फ्लाइट सकाळची होती. त्यामुळे आम्हाला सामन्यानंतर प्रवास करावा लागला. दुबईत आम्ही संध्याकाळी 4 वाजता पोहोचलो आणि सकाळी 7.30 वाजता आम्हाला परत यावं लागलं. असं नव्हतं की आम्ही 5 तासाच्या फ्लाईटने परत आलो होते. आमच्याकडे आराम करण्यासाठी आणि पूर्णपणे ठीक होण्यासाठी वेळ होता. पण हे नियोजन काही योग्य नव्हतं.’
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात डेविड मिलरने एकाकी झुंज दिली. एकिकडे आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर मधल्या फळीत डेविड मिलरने 67 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. यावेळी त्याने 10 चौकार आणि 4 षटकार मारले. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील हे सर्वात वेगवान शतक होतं. पण टीम काही 362 धावांचा आकडा गाठू शकली नाही. आता पराभवाचं खापर असं फोडणं कितीपत योग्य? असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.
