चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वीच पाकिस्तानची झोप उडाली, न्यूझीलंडने हॅटट्रीक केल्यास स्पर्धेबाहेर!
तिरंगी एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडने जेतेपद मिळवलं आहे. पण यामुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे. न्यूझीलंडन पाकिस्तानला त्यांच्याच धरतीवर दोन वेळा पराभूत केलं आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीत हॅटट्रीक झाली तर थेट स्पर्धेबाहेर जावं लागेल. चला जाणून घेऊयात काय गणित आहे ते

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी दोन गट असून एका गटात भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांग्लादेश हे संघ आहेत. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. पण या स्पर्धेपूर्वीच न्यूझीलंडमुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं आहे. पाकिस्तानचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वीच न्यूझीलंडला पराभूत करण्यास अपयशी ठरला आहे. असं एकदा नाही तर दोनदा झालं आहे. न्यूझीलंडने एकदा साखळी फेरीत आणि एकदा अंतिम फेरीत पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात पराभूत झाला तर स्पर्धेतील आव्हान डळमळीत होणार आहे. त्यामुळे न्यूझीलंडची विजयाची हॅटट्रीक पाकिस्तानला महागात पडणार आहे. कारण प्रत्येक संघाला साखळी फेरीत तीन सामने खेळायचे आहेत आणि त्यापैकी दोन सामन्यात विजय मिळवला की उपांत्य फेरी गाठणार आहे. त्यामुळे पहिल्याच सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं तर उर्वरित दोन सामन्यात काहीही करून विजय मिळवावा लागणार आहे. पाकिस्तानचा दुसरा सामना भारताशी होणार आहे. ही लढत वाटते तितकी सोपी नाही.
तिरंगी लढतीच्या अंतिम फेरीत पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. पण पाकिस्तानचा संघ 49.3 षटकात सर्व गडी गमवून 242 धावा करू शकला. पाकिस्तानने विजयासाठी दिलेलं 243 धावांचं आव्हान न्यूझीलंडने 5 गडी गमवून 45.2 षटकात पूर्ण केलं. यासह न्यूझीलंडने तिरंगी मालिकेचं जेतेपद आपल्या खिशात घातलं आहे. न्यूझीलंडने साखळी फेरीतील पहिल्या सामन्यातही 78 धावांनी पराभूत केलं होतं. न्यूझीलंडने 50 षटाकत 6 गडी गमवून 330 धावा केल्या आणि विजयासाठी 331 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना पाकिस्तानचा संघ 252 धावांवरच तंबूत गेला.
अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर कर्णधार मोहम्मद रिझवानने सांगितलं की, ‘आम्ही प्रथम फलंदाजी केली कारण आम्हाला वाटले की खेळपट्टी कठीण असेल. तसंच होतं, पण त्यांच्या गोलंदाजांना श्रेय द्यावं लागेल. सलमान आणि मला 3 विकेट गमावल्यानंतर भागीदारी करावी लागली. आम्ही 260 धावा करू शकलो असतो. मी चुकीच्या वेळी बाद झालो. क्षेत्ररक्षणात सुधारणा करण्याची गरज आहे. हा एक विभाग आहे जिथे आपल्याला सुधारणा करावी लागेल. अबरार क्षेत्ररक्षणात हुशार आहे, इतरांनाही तसंच करावं लागेल. प्रथम फलंदाजीचा दबावही सहन करायचा होता.’