Asia Cup 2025 : पाकिस्तान आता क्रिकेट जगतात एकटा पडणार… BCCI ने आशिया कपमध्ये घेतला मोठा निर्णय; पाकला धक्का
भारत-पाकिस्तानमधील तणावामुळे बीसीसीआयने 2025 चा पुरूष आशिया कप आणि महिला इमर्जिंग आशिया कपमध्ये सहभाग घेण्यास नकार दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. यामुळे आशिया कपचे आयोजन धोक्यात आले आहे. मात्र, याबाबतचा अधिकृत पुष्टी बीसीसीआयने केलेली नाहीये. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष पाकिस्तानचे गृहमंत्री आहेत. तसेच युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानला क्रिकेट जगतात एकटं पाडण्यासाठीच हा निर्णय घेतल्याचं समजतंय.

भारत आणि पाकिस्तान दरम्यान 8 मे रोजी सीजफायर करण्यात आलं. दोन्ही देशांकडून होणारे हल्ले थांबले असले तरी दोन्ही देशातील तणाव अजून काही निवळला नाही. पाकिस्तानच्या कुरापतीमुळे संपूर्ण जग चिंतीत आहे. भारतातही पाकिस्तानविरोधातील रोष उफाळून आला आहे. त्याचा परिणाम आता क्रिकेट क्षेत्रावरही दिसू लागला आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार, भारतीय संघ आगामी मेन्स आशिया कप 2025 खेळणार नाही. तसेच या कपचं यजमानपदही स्वीकारणार नाही, असं भारतीय क्रिकेट नियंत्रण बोर्ड (बीसीसीआय) ने एशियन क्रिकेट कौन्सिलला (एसीसी) तोंडी कळवल्याची माहिती आहे. मात्र, बीसीसीआयने अद्याप या वृत्ताला दुजोरा दिलेला नाहीये. पण, असे असेल तर बीसीसीआयच्या या निर्णयाचा क्रिकेट जगताला आणि पर्यायाने पाकिस्तानलाही मोठा झटका बसणार असल्याचं सांगितलं जात आहे.
भारत वूमेन्स इमर्जिंग टिम्स आशिया कप 2025मध्येही भाग घेणार नाही. हा कप पुढच्या महिन्यात श्रीलंकेत होणार आहे. भारतच या टुर्नामेंटमध्ये भाग घेणार नसल्याने वूमेन्स इमर्जिंग टिम्स आशिया कप रद्द करण्यात आला आहे. तर सप्टेंबरमध्ये होणाऱ्या मेन्स आशिया कपच्या आयोजनाबाबत एसीसीच्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
म्हणून दणका…
सध्या एशियन क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी आहेत. तेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) चेअरमनही आहेत. त्यामुळेच बीसीसीआयने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. पाकिस्तानला क्रिकेटच्या विश्वात एकटं पाडण्याचा भारताचा प्रयत्न आहे. तसंही दहशतवाद्याच्या मुद्द्यावर पाकिस्तान जगात तोंडघशी पडला आहे. आता बीसीसीआयही पाकिस्तानला मोठा दणका देण्याच्या तयारीत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
तर आयोजनच शक्य नाही
भारताने आशिया कपमध्ये भाग घेतला नाही तर या टुर्नामेंटचं आयोजन अशक्य आहे. कारण बहुतेक आंतरराष्ट्रीय सामन्यांचा प्रायोजक भारतच आहे. भारत-पाकिस्तान सामन्याच्या माध्यमातून ब्रॉडकास्यटरला मोठा फायदा होतो. अशावेळी भारताने टुर्नामेंटमधून अंग काढून घेतल्यास ब्रॉडकास्टरही त्यांचे हात मागे घेतील. गेल्यावर्षी आशिया कपचे राइट्स सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाने 170 मिलियन अमेरिकी डॉलर्समध्ये विकत घेतले होते. आठवर्षासाठी हे राइट्स घेतले आहेत. जर आशिया कप 2025चं आयोजन झालं नाही तर ही डील पुन्हा कमी करावी लागणार आहे.
आर्थिक नुकसान
एसीसीचे एकूण पाच मेंबर्स आहेत. त्यात भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका आणि आफगाणिस्तानचा समावेश आहे. ब्रॉडकास्टच्या माध्यमातून होणारी कमाईतून या पाचही देशांना 15-15 टक्के मिळतात. तर बाकी पैसा असोसिएट्स आणि संबंधित कंपन्यांमध्ये वाटला जातो. आशिया कप सप्टेंबरमध्ये होणार होता आणि भारत त्याचं यजमानपद स्वीकारणार होता.
बोर्ड भारत सरकारच्या निर्णयाचं पालन करेल, असं बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. जर आशिया कपममध्ये पाकिस्तानला घेण्यावरून एकमत झालं तरी ही टुर्नामेंट पूर्णपणे न्यूट्रल ठिकाणीच खेळली जाईल. म्हणजे दुबई किंवा श्रीलंकेत ही टुर्नामेंट होण्याची शक्यता आहे.
हायब्रिड मॉडेल
2023मध्ये आशिया कप खेळला गेला होता. वनडे वर्ल्ड कपपूर्वी हायब्रिड मॉडल अंतर्गत हा कप खेळवला गेला होता. यात भारत आणि पाकिस्तानला एकाच ग्रुपमध्ये ठेवलं होतं. त्यावेळी दोन्ही संघ मेगा इव्हेंटमध्ये दोन वेळा आमनेसामने आली होती. एकदा लीगमध्ये आणि नंतर सुपर 4 मध्ये. दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला. तर त्यावेळी पाकिस्तान फायलनमध्ये पोहोचू शकला नव्हता. तर भारताने अंतिम सामन्यात श्रीलंकेला नमवून कप जिंकला होता.
