
आयसीसी वूमन्स वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील सहाव्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने आहेत. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. पाकिस्तानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन फातिमा सना हीने टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.
टीम इंडियाची मॅचविनर ऑलराउंडर अमनज्योत कौर हीला पाकिस्तान विरूद्धच्या सामन्याला मुकावं लागलं आहे. अमनज्योत आजारी असल्याने ती या सामन्यात खेळणार नसल्याची माहिती कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने टॉसनंतर दिली. अमनज्योत कौर हीच्या जागी रेणुका सिंह ठाकुरला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. भारताला नाईलाजाने एकमेव बदल करावा लागला आहे.
अमनज्योतने या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाला श्रीलंकेविरुद्ध विजयी करण्यात निर्णायक भूमिका बजावली होती. अमनज्योतने श्रीलंकेविरुद्ध गुवाहाटीतील बारसपारा स्टेडियममध्ये भारतासाठी सर्वाधिक 57 धावा केल्या होत्या. तसेच अमनज्योतने टीम इंडिया अडचणीत असताना दीप्ती शर्मा हीच्यासह 30 सप्टेंबरला सहाव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली होती. तसेच अमनज्योतने 247 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या श्रीलंकेला 1 झटकाही दिला होता.
आता अमनज्योत हीला बाहेर व्हावं लागल्याने टीम इंडियाचा 1 बॅटिंग ऑप्शन कमी झाला आहे. त्यामुळे महिला ब्रिगेड ही उणीव कशी भरुन काढणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
दरम्यान टीम इंडिया एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात पाकिस्तानवर वरचढ राहिली आहे. टीम इंडियाने पाकिस्तानला 11 पैकी 11 सामन्यात पराभूत केलंय. त्यामुळे आता टीम इंडिया आता पाकिस्तान सलग 12 व्या सामन्यात पराभूत करण्यासाठी सज्ज आहे.
वूमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : प्रतिका रावल, स्मृती मांधना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कॅप्टन), जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), स्नेह राणा, रेणुका सिंग ठाकूर, क्रांती गौड आणि श्री चरणी.
वूमन्स पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : मुनीबा अली, सदफ शमास, सिद्रा अमीन, रमीन शमीम, आलिया रियाझ, सिद्रा नवाज (विकेटकीपर), फातिमा सना (कॅप्टन), नतालिया परवेझ, डायना बेग, नशरा संधू आणि सादिया इक्बाल.