
मुंबई : टी20 फॉर्मेटनंतर कसोटी क्रिकेटकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला हे कोणीही क्रिकेट जाणकार सांगेल. कसोटी क्रिकेटला नव संजीवनी देण्यासाठी वर्ल्ट टेस्ट चॅम्पियनशिप सुरु केली आहे. दुसरीकडे, टेस्ट क्रिकेटमध्ये फलंदाज आणि गोलंदाजांची खऱ्या अर्थाने कसोटी लागते. पाच दिवस खेळणं खेळाडूंच्या जीवावर येतं असाच एक मतप्रवाह तयार होताना दिसत आहे. त्या तुलनेत क्रिकेटच्या शॉर्ट फॉर्मेटमध्ये बऱ्यापैकी पैसा आहे. तसेच चौकार आणि षटकरांच्या आतषबाजीमुळे क्रिकेटरसिकांची ओढही जास्त आहे. त्यामुळे जगभरात अनेक टी20 क्रिकेट लीगचा भरणा झाला आहे. पण भारतीय खेळाडूंच्या बाबतीत या उलट आहे. भारतीय खेळाडूंना आयपीएल वगळता इतर लीगमध्ये खेळण्याची परवानगी नाही. पण असं असूनही भारतीय खेळाडूंचं देशांतर्गत क्रिकेटपेक्षा दुर्लक्ष होताना दिसत आहे. देशांतर्गत क्रिकेटपेक्षा आयपीएलकडे लक्ष केंद्रीत केल्याचं दिसत आहे. आता अशा खेळाडूंना लगाम लावण्यासाठी बीसीसीआयने पाऊल उचललं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, काही खेळाडूंनी देशांर्गत क्रिकेटऐवजी आयपीएलची तयारी करण्यास सुरुवात केली आहे. खेळाडूंचं हे वागणं पाहून बीसीसीआयने नाराजी व्यक्त केली आहे. टाइम इंडियाच्या वृत्तानुसार, खेळाडूंना आता रणजी ट्रॉफी खेळावीच लागणार आहे. फक्त दुखापतीतून सावरणाऱ्या खेळाडूंना यातून सूट देण्यात आली आहे. जानेवारीपासून आयपीएल मोडमध्ये गेलेल्या खेळाडूंवर बीसीसीआयने नाराजी व्यक्त केली आहे. . बीसीसीआयचा हा निर्णय इशान किशन, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या आणि दीपक चहर यांच्यासाठी आहे. हे खेळाडू फीट होऊनही आपापल्या राज्य संघाकडून खेळत नाहीत.
रणजी स्पर्धेच्या गट फेरीतील शेवटचा सामना 16 फेब्रुवारीला खेळला जाणार आहे. त्यानंतर 23 फेब्रुवारीपासून बाद फेरीचे सामने खेळवले जाणार आहेत. इशान किशन बडोदामध्ये ट्रेनिंग करत आहे. तर कृणाल पांड्या आणि दीपक चहर खेळत नाही. तर हार्दिक पांड्याही दुखापतीतून सावरल्याचं दिसत आहे. सोशल मीडियातील व्हिडीओतून ही बाब समोर आली आहे. हार्दिकने अनेक वर्षांपासून कसोटी क्रिकेट खेळलेले नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे. बीसीसीआयने अशा खेळाडूंना सावध करण्याचा आणि देशांतर्गत सामने खेळल्याशिवाय संघात परत न घेण्याचा निर्णय घेतला आहे.