प्रीति झिंटाने सामना गमावल्यानंतर घेतली अभिषेक शर्माची भेट, त्याच्याच स्टाईलमध्ये केलं अभिनंदन; म्हणाली…

आयपीएल 2025 स्पर्धेतील 27व्या सामन्यात षटकार आणि चौकारांचा पाऊस पडला. अभिषेक शर्मा नावाचं वादळ मैदानात घोंघावत होतं. त्याच्या खेळीपुढे पंजाबचे सर्व गोलंदाज निष्फळ ठरले. पण असं असूनही संघ मालकीन प्रीति झिंटाने त्याची भेट घेतली. तसेच सिग्नेचर सेलिब्रेशनने त्याचं अभिनंदनही केलं.

प्रीति झिंटाने सामना गमावल्यानंतर घेतली अभिषेक शर्माची भेट, त्याच्याच स्टाईलमध्ये केलं अभिनंदन; म्हणाली...
Image Credit source: video grab
| Updated on: Apr 13, 2025 | 4:20 PM

आयपीएल 2025 स्पर्धेत 200 पार धावा झाल्या की त्यांचा पाठलाग करणं कठीण जातं. त्यात पंजाब किंग्सने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 245 धावांची खेळी केली होती. त्यामुळे हा सामना हैदराबादच्या हातून गेला असंच मन क्रीडाप्रेमींनी केलं होतं. पण अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड यांचा झंझावात पाहून अशक्यही शक्य करून टाकलं. 18.3 षटकात सनरायझर्स हैदराबादने विजयासाठी दिलेलं आव्हान पूर्ण केलं. या विजयाचा शिल्पकार ठरला तो अभिषेक शर्मा.. त्याने 55 चेंडूत 14 चौकार आणि 10 षटकाराच्या मदतीने 141 धावा केल्या. तसेच पहिल्या विकेटसाठी ट्रेव्हिस हेडसोबत 171 धावांची भागीदारी केली. अभिषेक शर्माच्या या खेळीमुळे पंजाब किंग्सला सोपा वाटणारा विजय कधी हातून निघून गेला कळलंच नाही. शतकी खेळीनंतर अभिषेक शर्माने आपल्या सिग्नेचर स्टाईलमध्ये सेलीब्रेशन केलं. अभिषेक शर्मा मोठ्या खेळीनंतर कायम एक हात वर करून L आकारात प्रेक्षकांना हात दाखवतो.

अभिषेक शर्माचं सेलीब्रेशन पाहून प्रीति झिंटा त्याची फॅन झाली. सामना संपल्यानंतर प्रीति झिंटाने त्याची भेट घेतली. त्याला भेटताच तिने सिग्नेचर स्टाईल सेलीब्रेशन केलं. हा व्हिडीओ आणि फोटा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्रीति झिंटाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आणि त्यात लिहिलं की, “आजची रात्र अभिषेक शर्माची होती! किती प्रतिभा आणि किती अद्भुत खेळी त्याने खेळली. एसआरएचचे अभिनंदन! हा पराभव विसरून पुढे जाणे आपल्यासाठी चांगले होईल, स्पर्धा नुकतीच सुरू झाली आहे आणि असे सामने विसरणेच चांगले.”

सनरायझर्स हैदराबाद संघ या विजयासह गुणतालिकेत आठव्या स्थानावर पोहोचला आहे. सनरायझर्स हैदराबादने 4 गुण आणि -1.245 नेट रनरेटसह आठवं स्थान गाठलं आहे. सनरायझर्स हैदराबाद आतापर्यंत 6 सामने खेळले असून त्यापैकी 2 सामन्यात विजय आणि 4 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. पाच सामन्यात अभिषेक शर्माची बॅट काही चालली नव्हती. पण सहाव्या सामन्यात त्याचा आक्रमक अवतार पाहता आला. शतकी खेळीदरम्यान अभिषेक शर्मा भाग्यवान ठरला. कारण त्याला दोन जीवनदान मिळाले. अभिषेकला 28 धावांवर पहिले जीवदान, त्यानंतर 57 धावांवर दुसरे जीवनदान मिळाले.