Babar Azam: बाबर आझमच्या खांद्यावर पुन्हा एकदा येणार पाकिस्तान संघाची धुरा! पण…

पाकिस्तान क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज बाबर आझम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्या खांद्यावर पाकिस्तान संघाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लवकरच एका फॉर्मेटची जबाबदारी सोपवू शकते.

Babar Azam: बाबर आझमच्या खांद्यावर पुन्हा एकदा येणार पाकिस्तान संघाची धुरा! पण...
Babar Azam: बाबर आझमच्या खांद्यावर पुन्हा एकदा येणार पाकिस्तान संघाची धुरा! पण...
Image Credit source: PTI
| Updated on: Jul 04, 2026 | 6:00 PM

पाकिस्तान संघाला गेल्या काही वर्षात उतरती कला लागली आहे. त्यामुळे पाकिस्तान संघात उलथापालथी होत आहेत. आता आणखी एक बातमी समोर आली आहे. रिपोर्टनुसार, स्टार फलंदाज बाबर आझम याच्याकडे पुन्हा एकदा पाकिस्तान संघाची धुरा सोपवण्याची तयारी सुरू झाली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिल्याचं बोललं जात आहे. पाकिस्तान संघाच्या कसोटी संघाची धुरा त्याच्या खांद्यावर टाकली जाणार असल्याचं बोललं जात आहे. कारण कसोटी फॉर्मेटमध्ये पाकिस्तान संघाची कामगिरी निराशाजनक आहे. त्यात शान मसूदच्या कर्णधारपदावर टीकेची झोड उठली आहे. त्यामुळे त्याची जागा बाबर आझम घेण्याची शक्यता आहे.

शान मसूदचा पत्ता कट होणार!

शान मसूदने 2023 मध्ये पाकिस्तानच्या कसोटी संघाची धुरा सांभाळण्यास सुरूवात केली. पण मागच्या तीन वर्षांच्या कालावधीत त्याच्या नेतृत्वात संघाने सुमार कामगिरी केली आहे. पाकिस्तानने त्याच्या नेतृत्वात 16 सामने खेळले आणि 12 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं. याच वर्षी मे महिन्यात पाकिस्तानने बांग्लादेश दौरा केला होता. या दौऱ्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 ने गमावली. या पराभवानंतर शान मसूदच्या कर्णधारपदावर आणि त्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं. माजी क्रिकेटपटूंनी शान मसून आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला धारेवर धरलं. पीसीबीचे काही अधिकारी आणि सहकारी बाबर आझमला पुन्हा कसोटी कर्णधार म्हणून नियुक्त करण्याच्या बाजूने आहेत.

रिपोर्टनुसार, शान मसूद हा देखील त्याच्या कामगिरीवर निराश आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डात कायमस्वरूपी प्रशासकीय भूमिका स्वीकारण्याचा विचार करत आहे. त्याचा प्रस्ताव बोर्ड अध्यक्षांनी त्याला आधीच दिला आहे. दुसरीकडे, बाबर आझमने 2019 ते 2023 या कालावधीत पाकिस्तानच्या तिन्ही फॉर्मेटचे कर्णधारपद भूषवलं आहे. पण 2023 वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर कर्णधारपद सोडले. त्यानंतर 2024 टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी त्याची कर्णधार म्हणून नियुक्ती केली. पण त्यातही साखळी फेरीत आव्हान संपुष्टात आल्याने राजीनामा दिला. आता पुन्हा एकदा रेड बॉल क्रिकेटमध्ये कर्णधारपद भूषवण्यास सज्ज झाला आहे.

Follow Us