पृथ्वी शॉने मैदानात केलेल्या राड्यानंतर मागितली माफी, चौकशीच्या आदेशानंतर मुशीर खानला म्हणाला….

रणजी ट्रॉफी 2025-2026 स्पर्धेपूर्वी मुंबई आणि महाराष्ट्र संघात सराव सामना पार पडला. या सामन्यात पृथ्वी शॉची आक्रमक खेळी पाहायला मिळाली. पण बाद झाल्यानंतर मैदान सोडून जाताना मुंबईच्या खेळाडूंसोबत हुज्जत घातली. त्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले होते.

पृथ्वी शॉने मैदानात केलेल्या राड्यानंतर मागितली माफी, चौकशीच्या आदेशानंतर मुशीर खानला म्हणाला....
पृथ्वी शॉने मैदानात केलेल्या राड्यानंतर मागितली माफी, चौकशीच्या आदेशानंतर मुशीर खानला म्हणाला....
Image Credit source: video grab
| Updated on: Oct 10, 2025 | 6:10 PM

पृथ्वी शॉ आणि वाद आता हे समीकरण जुळून आलं आहे. गेल्या काही वर्षात काही ना काही वाद होत आहे. त्यामुळे पृथ्वी शॉ त्याच्या क्रिकेट कारकि‍र्दीपेक्षा इतर कारणांमुळेच जास्तच चर्चेत राहीला. पृथ्वी शॉला मागच्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबई संघातून डावलण्यात आलं होतं. त्यामुळे संपूर्ण पर्व त्याला बसून काढावं लागलं. 2024 मध्ये फिटनेस आणि वर्तणुकीच्या कारणास्तव त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला होता. मात्र त्यानंतर पृथ्वी शॉने आपला रस्ताच बदलला. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून ना हरकत प्रमाणपत्र घेऊन महाराष्ट्रातून खेळण्यास सुरुवात केली आहे. रणजी ट्रॉफी 2025-2026 स्पर्धेचं नवं पर्व सुरु होत आहे. या पर्वापूर्वी मुंबई आणि महाराष्ट्र हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात पृथ्वी शॉने आक्रमक खेळी केली. शतकी खेळीनंतर बाद झाला आणि त्याने मैदानात मुंबईच्या खेळाडूंशी वाद घातला. मुशीर खानला भिडला होता, तेव्हा पंचांनी मध्यस्थी करून प्रकरण सोडवलं होतं. आता या प्रकरणी चौकशीचे आदेश दिल्यानंतर पृथ्वी शॉने मुशीर खानची माफी मागितली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार पृथ्वी शॉने मुशीर खानची माफी मागितली आहे. पृथ्वी शॉने सांगितलं की, ‘मी तुझ्या मोठ्या भावासारखा आहे.’ सामन्याच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करत असताना मुशीरने अर्शिन कुलकर्णीला बाद केलं. यानंतर पृथ्वी मुशीरजवळ गेला आणि खांद्यावर हात ठेवून चर्चा करू लागला. तेव्हा या दोघांमध्ये मैत्रिपूर्ण संबंध दिसून आले. मुशीरने पृथ्वीला सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी दोघेही हसताना दिसले. त्यामुळे दोघांमधील गैरसमज दूर झाल्याचं स्पष्ट झालं आहे. 9 ऑक्टोबर रोजी झालेल्या वादाची चौकशी करण्याची जबाबदारी भारताचा माजी कर्णधार दिलीप वेंगसरकरकडे यांच्याकडे सोपवण्यात आली होती. पण चौकशीपूर्वी या दोघात समेट झाल्याचं दिसून आलं आहे.

पृथ्वी शॉने मुंबई विरूद्धच्या सराव सामन्यातील पहिल्या डावात 220 चेंडूत 3 षटकार आणि 21 चौकारांसह 181 धावा केल्या होत्या. रणजी ट्रॉफीपूर्वी त्याची बॅट चांगलीच तळपली. त्यामुळे या पर्वात त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. या पर्वात पृथ्वी शॉने चांगली कामगिरी केली तर त्याला आयपीएल आणि टीम इंडियाचं दारं खुलं होणार आहे. जर या पर्वात फेल गेला तर मात्र त्याचं पुढचं गणित खूपच कठीण होणार आहे. त्यामुळे त्याला या स्पर्धेत सावधपूर्ण खेळावं लागणार आहे. महाराष्ट्राकडून पृथ्वी शॉ पहिल्यांदाच खेळणार आहे.