
भारताचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉचं क्रिकेट करिअर संकटात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून फॉर्म नसल्याने त्याला कोणीही भाव देत नसल्याचं दिसून आलं आहे. फिटनेसचं कारण देत मुंबई क्रिकेट असोसिएशनने त्याला रणजी संघातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी झालेल्या मेगा लिलावात त्याला कोणत्याच संघाने टीममध्ये घेण्यास रस दाखवला नाही. त्यामुळे त्याला देश सोडण्याशिवाय पर्याय नसल्याचं दिसत आहे. खरंच देशाबाहेर जाऊन क्रिकेट करिअर वाचेल का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. कारण पुढच्या काही महिन्यात चर्चेत राहण्यासाठी त्याला काउंटी चॅम्पियनशिप खेळणं भाग आहे. या स्पर्धेत 2024 स्पर्धेत खेळला होता आणि चांगलं प्रदर्शन केलं होतं. 23 जानेवारीपासून रणजी ट्रॉफी स्पर्धेचा पुढचा टप्पा सुरु होत आहे. पृथ्वी शॉला वगळण्यात आल्याने या स्पर्धेत खेळणं कठीण आहे. त्यानंतर पुढचे दोन महिने आयपीएल स्पर्धा असेल. त्यामुळे पुढचे काही महिने रिकामं बसावं लागेल. त्यामुळे त्याला क्रिकेट करिअर वाचण्यासाठी इंग्लंड काउंटी चॅम्पियनशिप खेळणं भाग आहे.
काउंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन 1 आणि 2 चे सामने एप्रिल 2025 मध्ये सुरु होणार आहे. आता पृथ्वी शॉ काउंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतो की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. यापूर्वी पृथ्वी शॉ काउंटी क्रिकेटमध्ये नॉर्थम्पटनशायर संघाकडून खेळला होता. पृथ्वी शॉ 2023 मध्येही काउंटी क्रिकेट खेळला आहे. दोन पर्वात त्याने चांगली कामगिरी केली आहे. पृथ्वी शॉने 153 चेंडूत 244 धावा करत रेकॉर्डब्रेक कामगिरी केली होती. आता पुन्हा एकदा त्याला ट्रॅकवर परतण्यासाठी फिटनेस दाखवावा लागेल. तसेच क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
पृथ्वी शॉ आंतरराष्ट्रीय पातळीवर 5 कसोटी, 6 वनडे आणि 1 टी20 सामना खेळला आहे. पाच कसोटी सामन्यांच्या 9 डावात त्याने एका शतकी खेळीच्या जोरावर 339 धावा केल्या आहेत. यात त्याने दोन अर्धशतकंही ठोकली आहेत. तर वनडे क्रिकेटमध्ये काही खास करू शकला नाही. त्याने सहा वनडे सामन्यात 189 धावा केल्या आहेत. त्याला एकमेव टी20 सामना खेळण्याची संधी मिळाली. त्यातही त्याला आपलं खातं खोलता आलं नाही.