Prithvi Shaw Controversy : पृथ्वीच्या अडचणी वाढणार, कोठडीत असलेल्या सपना गिलकडून मोठा आरोप

Prithvi Shaw Controversy : मॉडेल, भोजपुरी अभिनेत्री सपना गिलच्या अटकेमुळे पृथ्वी शॉ ला मिळालेला दिलासा क्षणिक ठरला आहे. न्यायालयाने सपना गिलला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Prithvi Shaw Controversy : पृथ्वीच्या अडचणी वाढणार, कोठडीत असलेल्या सपना गिलकडून मोठा आरोप
Prithvi shaw-Sapna gill
| Updated on: Feb 21, 2023 | 11:47 AM

Prithvi Shaw Selfie Controversy : टीम इंडियाचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ च्या अडचणीत आणखी भर पडणार आहे. मॉडेल, भोजपुरी अभिनेत्री सपना गिलच्या अटकेमुळे पृथ्वी शॉ ला मिळालेला दिलासा क्षणिक ठरला आहे. न्यायालयाने सपना गिलला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याचवेळी तिने पृथ्वी शॉ विरोधात विनयभंगाचा तक्रार नोंदवलीय. त्यामुळे पृथ्वीच्या अडचणीत आणखी भर पडणार आहे. पृथ्वी विरोधात कलम 34, 120 ब (गुन्हेगारी कारस्थान), 146, 148, 149, 323, 324, 351, 354 (विनयभंग) आणि कलम 509 अंतर्गत तक्रार दाखल केलीय.

गुन्हा कधी घडला? अटक कधी झाली?

पृथ्वी शॉ वर हल्ल्याचा प्रयत्न, शिवीगाळ आणि कार तोडफोड प्रकरणी सपना गिलला 17 फेब्रुवारीला मुंबई पोलिसांनी अटक केली. हा सर्व प्रकार 15 फेब्रुवारीला घडला होता. सपना गिल आणि तिच्या मित्रांसोबत दुसऱ्यांदा सेल्फी घेण्यास नकार दिला, म्हणून त्यांनी आपल्यावर हल्ला केला, असा आरोप पृथ्वी शॉ ने केला आहे. मित्रांसमवेत मी हॉटेलमध्ये डीनर करत होतो, असं पृथ्वी शॉ ने पोलिसांना सांगितलं.

सपना गिलवर कोणत्या कलमातंर्गत गुन्हा?

मारहाण आणि कारची तोडफोड केल्याप्रकरणी पृथ्वी शॉ आणि त्याचा मित्र आशिष सुरेंद्र यादवने सपना गिल आणि तिच्या मित्रांविरोधात तक्रार दाखल केली. FIR झाल्यानंतर ओशिवरा पोलिसांनी सपना गिल आणि अन्य 7 जणांना अटक केली. पोलिसांनी सपना आणि अन्य आरोपींवर इंडियन पीनल कोडच्या कलम 143, 148, 149, 384, 437, 504, आणि 506 अंतर्गत आरोप ठेवले आहेत.


FIR कॉपीमध्ये काय म्हटलय?

पहाटे 4 च्या सुमारास शॉ आणि त्याचे मित्र हॉटेलमध्ये डिनरसाठी आले होते. त्यावेळी सपन गिल आणि तिच्या मित्रांनी शॉ सोबत सेल्फी काढण्यासाठी आग्रह धरला. पृथ्वीने सुरुवातीला काही जणांसोबत सेल्फी काढला व गिलचा आग्रह कायम होता. त्यावेळी शॉ ने नकार दिला. मी मित्रांसोबत डिनरसाठी आलो आहे. आम्हाला त्रास देऊ नका, असं पृथ्वी शॉ ने त्यांना सांगितलं, हे सर्व FIR च्या कॉपीमध्ये नमूद आहे.

पृथ्वी शॉ च्या मित्राने हॉटेलच्या मॅनेजरला बोलावलं व गिलसोबत असलेल्या ग्रुपविरोधात तक्रार केली. मॅनेजरने त्या ग्रुपला बाहेर जाण्यास सांगितलं. त्यानंतर शॉ आणि त्याचे मित्र हॉटेलबाहेर येत होते. त्यावेळी आरोपी शॉ च्या मित्राची कार नासधूस करत असल्याच पाहिलं. बेसबॉलची बॅट हातात असल्याच दिसतय. कारची पुढची काच फुटली होती.