सीएसकेत गेला तरी संजू सॅमसनला कर्णधारपद मिळणार नाही! माजी खेळाडूचं स्पष्ट मत

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी ट्रेड विंडोची जोरदार चर्चा रंगली आहे. खासकरून संजू सॅमसन आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणाऱ्या डीलबाबत चर्चांना उधाण आलं आहे. पण राजस्थान सोडून जर संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्समध्ये रूजू झाला तर कर्णधारपद मिळणार का? याबाबत सीएसकेचा माजी क्रिकेटपटू आर अश्विनने मत व्यक्त केलं आहे.

सीएसकेत गेला तरी संजू सॅमसनला कर्णधारपद मिळणार नाही! माजी खेळाडूचं स्पष्ट मत
सीएसकेत गेला तरी संजू सॅमसनला कर्णधारपद मिळणार नाही! माजी खेळाडूचं स्पष्ट मत
Image Credit source: BCCI
| Updated on: Nov 11, 2025 | 4:38 PM

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी घडामोडींना वेग आला आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याच्यासाठी चेन्नई सुपर किंग्सने फासे टाकले आहेत. ट्रेड विंडोच्या माध्यमातून संजूला संघात घेण्यासाठी चर्चा सुरु आहे. ही चर्चा अंतिम टप्प्यात आली असून करार जवळपास निश्चित असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे पुढच्या पर्वात संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्सच्या जर्सीत दिसला तर आश्चर्य वाटायला नको. चेन्नई सुपर किंग्सने संजू सॅमसनच्या बदल्यात रवींद्र जडेजाला देण्याची तयारी केली आहे. मिडिया रिपोर्टनुसार, रवींद्र जडेजासह सॅम करनलाही सोडण्याचं मन केलं आहे. पण चेन्नई सुपर किंग्सकडून संजू सॅमसन कर्णधारपद भूषवणार का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. या प्रश्नाबाबत चेन्नई सुपर किंग्सचा माजी खेळाडू आर अश्विनने आपलं मत व्यक्त केलं आहे. आर अश्विनने स्पष्ट सांगितलं की, मान्य केलं की चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील करार पूर्ण होईल. पण संजू सॅमसनला पुढच्या पर्वात कर्णधारपद मिळेल असं वाटत नाही.

आर अश्विनने आपल्या युट्यूब चॅनेलवर सांगितलं की, ‘मला वाटत नाही की संजू सॅमसनला कर्णधारपद मिळेल. कारण त्याचं चेन्नईकडून पहिलंच पर्व असणारआहे. कोणत्याही खेळाडूला पहिल्याच वर्षी कर्णधारपद देणं योग्य वाटत नाही. ऋतुराज गायकवाड कर्णधार असेल. पण भविष्यात संजू सॅमसन एक पर्यात असणार हे निश्चित आहे.’ संजू सॅमसनने 2021 ते 2025 या दरम्यान 67 सामन्यात राजस्थान रॉयल्सचं कर्णधारपद भूषवलं आहे. आता राजस्थान रॉयल्सला सोडून चेन्नई सुपर किंग्ससोबत जाण्याची तयारी केली आहे.

राजस्थान रॉयल्स संघाला रवींद्र जडेजामुळे फायदाच होणार आहे, असंही आर अश्विन पुढे म्हणाला. कारण फ्रेंचायझी गेल्या काही वर्षात एका चांगल्या फिनिशरच्या शोधात आहे. यामुळे शिमरन हेटमायरच्या डोक्यावरचा भार काही प्रमाणात हलका होईल. जडेजा आताही सर्वश्रेष्ठ फिनिशरपैकी एक आहे. डेथ ओव्हरमध्ये त्याचा स्ट्राईक रेट हा 150 पेक्षा जास्त आहे. तर मधल्या षटकात फिरकीपटूंविरुद्ध वेगाने धावा करण्याची ताकद आहे. रवींद्र जडेजाने 2012 ते 2025 या कालावधीत सीएसकेसाठी 186 सामने खेळले आहेत.