World Cup : वनडे वर्ल्डकपबाबत आर अश्विनने केला मोठा खुलासा, दिनेश कार्तिकसोबत चर्चा करताना म्हणाला..
World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप संघात शेवटच्या क्षणी आर अश्विनची निवड झाली आहे. 2011 आणि 2015 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियात खेळला होता. आता पुन्हा निवड झाल्यानंतर आपलं मत व्यक्त केलं आहे.

मुंबई : वनडे वर्ल्डकप संघात फिरकीपटू आर अश्विन याची एन्ट्री झाली आहे. अक्षर पटेल दुखापतग्रस्त झाल्याने आर अश्विनची संघात निवड झाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात वनडे वर्ल्डक खेळणार आहे. 37 वर्षीय आर अश्विन याचा हा तिसरा वनडे वर्ल्डकप आहे. 2011 आणि 2015 वर्ल्डकप स्पर्धेत महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात आर अश्विन खेळला होता. पण 2019 वनडे वर्ल्डकप संघातून वगळण्यात आलं होतं. भारत आणि इंग्लंड यांच्यात वॉर्मअप सामना होता. पण पावसामुळे सामना रद्द करण्यात आला. या दरम्यान आर अश्विन याने ब्रॉडकास्टरसोबत चर्चा करताना आपल्या भविष्याबात संकेत दिले. हा वनडे वर्ल्डकप शेवटचा असेल असं त्याने सांगून टाकलं.
काय म्हणाला आर अश्विन?
गुवाहाटीत भारत आणि इंग्लंड यांच्यातील वॉर्मअप सामन्यापूर्वी दिनेश कार्तिकने आर अश्विनसोबत संवाद साधला. तेव्हा अश्विनने सांगितलं की, “मी आधीच सांगत आलो आहे की हा माझा शेवटचा विश्व चषक असू शकतो. खरं सांगायचं तर मी टीममध्ये मला स्थान मिळेल याबाबत विचार केला नव्हता. मागच्या चार पाच वर्षात खेळाचा आनंद घेणं हा माझा मुख्य उद्देश आहे. या स्पर्धेतही चांगल्या कामगिरीसह मी तसंच करेन.”
” या स्पर्धेत खेळाडूंवर दबाव आहे. मला वाटतं चांगल्या मानसिक स्थितीत राहून खेळाचा आनंद घेणं गरजेचं आहे. माझ्या मते स्पर्धेचा आनंद घेणं अधिक महत्त्वाचं आहे.” असं आर अश्विन याने सांगितलं. दुसरीकडे, संघात स्थान मिळण्यापूर्वी आर अश्विन याने ऑस्ट्रेलियाला जेतेपदासाठी प्रमुख दावेदार मानलं होतं. पण भारतावरील दबाव दूर करण्यासाठी असं बोलल्याचं अश्विनने त्यावेळी सांगितलं होतं.
“वनडे वर्ल्डकप जेतेपदासाठी माझी पसंती ऑस्ट्रेलियाला आहे. मला माहिती आहे अनेक दिग्गज खेळाडूंनी भारताला पसंती दिली आहे. पण ही टीम इंडियाला दडपणाखाली ठेवण्याची रणनिती आहे.”, असं त्याने स्पष्टपणे सांगितलं होतं.
2023 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत आर अश्विनला खऱ्या अर्थाने डावलण्यात आलं होतं. मात्र अक्षर पटेल जखमी असल्याने शेवटच्या क्षणी आर अश्विनची संघात वर्णी लागली आहे. आता त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची क्रीडाप्रेमींना अपेक्षा आहे.
