‘त्या’ चुकीसाठी संजू सॅमसनवर मोठी कारवाई, बीसीसीआयने उचललं असं पाऊल

आयपीएल 2024 स्पर्धेत 56वा सामना राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सवर 20 धावांनी नमवलं. या सामन्यात संजू सॅमसनचं आऊट होणं वादाचं कारणं ठरलं. त्यानंतर घडलेल्या घडामोडींमुळे बीसीसीआयने कारवाई केली आहे.

त्या चुकीसाठी संजू सॅमसनवर मोठी कारवाई, बीसीसीआयने उचललं असं पाऊल
Image Credit source: Twitter
| Updated on: May 08, 2024 | 3:33 PM

आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्सची विजयी घोडदौडीला काही अंशी ब्रेक लागला आहे. दिल्ली कॅपिटल्सनेही मंगळवारी झालेल्या सामन्यात 20 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात 15व्या षटकापर्यंत कोण सामना जिंकेत सांगता येत नव्हतं. पण संजू सॅमसनची विकेट पडली आणि सामना खऱ्या अर्थाने दिल्ली कॅपिटल्सच्या पारड्यात झुकला. संजू सॅमसनने षटकाराच्या दिशेने फटका मारला. पण चेंडू थेट शाई होपच्या हाती गेला. मात्र त्याचा पाय बॉण्ड्रीवरील रोपला टेकला की नाही हा वादाचा मुद्दा ठरला. या कॅचमध्ये काही सूताचं अंतर असू शकतं की थेट पाय रोपला टेकला असावा. अशा दोन चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. पण सामन्यात पंचांनी संजू सॅमसनला बाद घोषित केलं. मात्र या निर्णयाशी संजू सॅमसन पूर्णत: असहमत दिसला. त्याने मैदानात पंचांशी वाद घातला. मात्र तरीही त्यावर काही तोडगा निघाला नाही आणि तंबूत परतावं लागलं. आता त्याच्या या वर्तनासाठी बीसीसीआयने त्याला दंड ठोठावला आहे. त्याच्या मॅच फीमधून 30 टक्के रक्कम दंड म्हणून आकारली जाणार आहे.

“राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात आयपीएल आचारसंहितेचं उल्लंघन केलं आहे. यासाठी त्याच्या मॅच फीमधून 30 टक्के रक्कमेचा दंड ठोठावला आहे. आयपीएल आचारसंहितेच्या आर्टिकल 2.8 अंतर्गत सॅमसनने लेवल 1 चा गुन्हा केला आहे. राजस्थान रॉयल्सच्या कर्णधाराने मॅच रेफरीच्या ठोठावलेला दंड आणि गुन्हा मान्य केला आहे. मॅच रेफरीचा निर्णय योग्य आणि सर्वमान्य आहेय”, असं बीसीसीआयने सांगितलं आहे.

दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्ससमोर विजयासाठी 222 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसन एका बाजूने खिंड लढवत होता. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचे गोलंदाज पुरते हैराण झाले होते. संजू सॅमसनने 46 चेंडूत 8 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 86 धावा केल्या. संजू सॅमसन बाद झाल्यानंतर दिल्लीने सामन्यावर पकड मिळवली. तसेच शेवटी दिल्लीने राजस्थानला 20 धावांनी मात दिली. दरम्यान संजू सॅमसनला दंड ठोठावण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 10 एप्रिलला गुजरात टायटन्सविरुध्दच्या सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी 12 लाखांचा दंड ठोठावला होता.