
बुधवार 15 ऑक्टोबरपासून देशांतर्गत क्रिकेट हंगामातील सर्वात प्रतिष्ठेच्या अर्थात रणजी ट्रॉफी 2025 स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेत एकूण 38 संघांमध्ये एका ट्रॉफीसाठी चुरस पाहायला मिळणार आहे. या 38 पैकी 36 संघांचा एलीट ग्रुपमध्ये समावेश आहे. तर प्लेट ग्रुपमध्ये 6 संघांचा समावेश आहे.
या स्पर्धेतील पहिल्या फेरीत 19 सामने खेळवण्यात येणार आहेत. तसेच या स्पर्धेत 2 टप्प्यांमध्ये एकूण 138 सामने होणार आहेत. गतविजेता विदर्भ ट्रॉफी कायम राखण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. इराणी ट्रॉफी जिंकल्याने विदर्भाचा विश्वास दुणावलेला आहे. त्यामुळे विदर्भ कशी कामगिरी करते? याकडे लक्ष असणार आहे. विदर्भ या मोहिमेतील आपला पहिला सामना नागालँड विरुद्ध खेळणार आहे. मुंबई जम्मू काश्मीर विरुद्ध भिडणार आहे. तर उपविजेता केरळ महाराष्ट्र विरुद्ध 2 हात करणार आहे. या स्पर्धेनिमित्ताने काही ठळक मुद्द्यांबाबत आपण जाणून घेऊयात.
करुण नायर 2 वर्षांनंतर पुन्हा एकदा कर्नाटक टीमकडून खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. करुण नायरने गेल्या 2 स्पर्धेत विदर्भाचं प्रतिनिधित्व केलं होतं. करुणने 2 हंगामात चाबूक कामगिरी केली होती. तसेच करुणने विदर्भाला चॅम्पियन करण्यात बॅटिंगने निर्णायक भूमिका बजावली होती. मात्र करुणच्या कमबॅकमुळे कर्नाटकाला बूस्टर मिळाला आहे. आता कर्नाटकाला त्याचा किती फायदा होतो तसेच करुण कशी कामगिरी करतो? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
पृथ्वी शॉ याने काही महिन्यांपूर्वी मुंबईची साथ सोडत महाराष्ट्रसोबत नवी सुरुवात केली. आता या स्पर्धेत पृथ्वी कशी कामगिरी करतो? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
यंदाच्या हंगामासाठी ऑलराउंडर शार्दूल ठाकुर याच्याकडे मुंबई संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. मुंबईला गेल्या हंगामात उपांत्य फेरीत विदर्भाकडून पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे मुंबईचा मुसंडी मारण्याचा प्रयत्न असणार आहे. तसेच मुंबईचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे याच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे.
मुंबई विरुद्ध जम्मू काश्मीर या सामन्यात रोहित शर्मा याच्याकडे लक्ष असणार आहे. मात्र हा रोहित शर्मा मुंबईचा नाही तर जम्मू काश्मिरचा आहे. त्यामुळे रोहितला संधी मिळाल्यास तो मुंबई विरुद्ध खेळणार हे निश्चित आहे.
रणजी ट्रॉफी स्पर्धेतील सामने टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येतील.
रणजी ट्रॉफी स्पर्धेतील सामने मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवरुन पाहायला मिळतील.