रनआऊट होण्याच्या 2 बॉलआधी असं काय घडलं ज्यामुळे पंतने चोरटी धाव घेण्याची जोखीम घेतली?
भारत आणि इंग्लंड कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने चांगली सुरुवात केली. पहिलं सत्र चांगलंच गाजवलं होतं. मात्र लंचपूर्वी भारताच्या ऋषभ पंतकडून मोठी चूक झाली. त्याने आपली विकेट इंग्लंडला गिफ्ट दिली.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामन्यात उत्सुकता आता ताणली जाणार आहे. कारण सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने जोरदार कमबॅक केलं आहे. इंग्लंडने पहिल्या डावात सर्व गडी बाद 387 धावांची खेळी केली होती. या धावांचा पाठलाग करताना भारताला सुरुवातीला धक्का बसला. यशस्वी जयस्वाल स्वस्तात बाद झाला. तर शुबमन गिलही काही खास करू शकला नाही. करुण नायरने थोडी फार झुंज दिली. मात्र 40 धावांवर असताना बाद झाला. त्यानंतर केएल राहुल आणि ऋषभ पंत यांनी डाव सावरला. तिसऱ्या विकेटसाठी 100हून अधिक धावांची भागीदारी केली. तसेच इंग्लंडच्या गोलंदाजांना तिसऱ्या दिवशीही झुंजवलं. पण लंचपूर्वीच्या शेवटच्या षटकात मोठी चूक घडली. ऋषभ पंतची विकेट काढली नाही तर ती त्याने दिली असंच म्हणावं लागेल. पण या विकेटपूर्वी एक ड्रामा घडला. त्यामुळेच ऋषभ पंतची विकेट पडली असं आता चाहते म्हणत आहेत.
बशीरच्या पहिल्याच चेंडूवर 97 धावांवर असलेल्या केएल राहुलने स्वीपर कव्हरला मारला. या चेंडूवर त्याने दोन धावा घेण्यासाठी प्रयत्न केला. पण पंतने त्याला नकार दिला. त्यामुळे केएल राहुल नाराज दिसला. त्याने यावर दोन धावा असल्याचं सांगितलं. त्यानंतर स्ट्राईकला आलेल्या ऋषभ पंतने दुसरा चेंडू खेळला आणि निर्धाव गेला. तिसऱ्या चेंडूवर त्याने कव्हर पॉइंटच्या दिशेने फटका मारला. शॉट खेळताच त्याने दुसऱ्या टोकावर उभ्या असलेल्या केएल राहुलला धावण्यासाठी हाक मारली.पंत क्रीजच्या पुढे गेला होता.
RUN OUT! 🙌
Ben Stokes aims and fires at the stumps and Rishabh Pant is out! ❌ pic.twitter.com/Z9JWwV9aS4
— England Cricket (@englandcricket) July 12, 2025
ऋषभ पंतची हाक ऐकून राहुल धाव घेण्यासाठी पुढे सरसावला. पण ऋषभ पंत धावताना अडखळला आणि नॉन-स्ट्राइक एंडकडे गेला. बेन स्टोक्सने अतिशय चपळाईने चेंडू पकडला आणि नॉन-स्ट्राइक एडकडे फेकला.चेंडू थेट स्टंपवर आदळला. पंत काही क्रीजपर्यंत पोहोचला नव्हता आणि पंचांनी त्याला बाद घोषित केलं. लंच ब्रेकपर्यंत भारताने 65.3 षटकात चार गडी गमवून 248 धावा केल्या होत्या. भारतीय संघ 139 धावांनी पिछाडीवर होता.
