जरा समोरच्याची इज्जत करा… रोहित शर्माचा निवृत्तीनंतर संयम सुटला, ‘या’ लोकांवर जोरदार हल्ला; रडारवर कोण?

टी20 नंतर रोहित शर्माची कसोटी कारकिर्द आता संपली आहे. रोहित शर्माने 7 मे 2025 रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून कसोटीतून निवृत्ती घेतल्याचं जाहीर केलं. पण त्यानंतर भलत्याच चर्चा रंगल्या. त्यामुळे रोहित शर्मा आक्रमक झाला आहे. त्याने टीकाकारांना चोख उत्तर दिलं आहे.

जरा समोरच्याची इज्जत करा... रोहित शर्माचा निवृत्तीनंतर संयम सुटला, या लोकांवर जोरदार हल्ला; रडारवर कोण?
रोहित शर्मा
Image Credit source: PTI
| Updated on: May 08, 2025 | 8:06 PM

रोहित शर्माने टी20 वर्ल्डकप 2024 जिंकल्यानंतर या फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. कसोटी आणि वनडे क्रिकेट खेळणं सुरु ठेवलं होतं. भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठेल असं सहज वाटत होतं. पण तसं काही झालं नाही. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यामुळे अंतिम फेरी गाठता आली नाही. त्यावेळेस कर्णधार रोहित शर्मावर टीका झाली. पण त्याने त्यावेळेस निवृत्ती जाहीर केली नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी आणि जेतेपद मिळवलं. त्यामुळे हे प्रकरण थंड झालं होतं. तसेच टीम इंडियाचं इंग्लंड दौऱ्यात रोहित शर्मा नेतृत्व करेल असं वाटत होतं. पण आयपीएल स्पर्धेदरम्यान रोहित शर्माने सोशल मीडियाच्या माध्यमातून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला. पण निवृत्ती घेतल्यानंतर अनेकांनी त्याच्यावर निशाणा साधला. तसेच ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. यामुळे रोहित शर्मा संतापला आहे. रोहित शर्माच्या मते, भारतात काही लोकं जाणीवपूर्वक समालोचन करताना अशा गोष्टी सांगतात की त्यामुळे प्रतिमा डागाळते. काही लोकं मसाला टाकण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा बोलण्याचा अधिकार आहे, पण त्याचा काहीही बोलणं असा होत नाही.

रोहित शर्मा कोणावर संतापला?

रोहित शर्माने क्रीडा पत्रकार विमल कुमार याच्याशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. रोहित शर्मा म्हणाला की, ‘लोकं क्रिकेटवर प्रेम करतात. त्यांना मसाला नको. त्यांना फक्त क्रिकेट पाहायचं आहे. आज आपण त्यात खूप जास्तच मसाला टाकतो. खेळाडूंचा फॉर्म खराब का आहे? हे क्रिकेट चाहत्यांना हवं आहे. त्यांना खेळाडूंच्या खासगी आयुष्याशी काही देणं घेणं नाही.’ रोहित शर्मा इथेच थांबला नाही. त्याने पुढे जात समालोचकांचे कानही टोचले. ‘त्यांच्याकडे बोलण्याचा अधिकार आहे म्हणून ते काहीही बोलतील असं नाही ना. खेळाडूंचा मान राखणं गरजेचं आहे. जे खेळाडू वर्ल्डकप खेळतात ते आदरास पात्र आहेत 24 पैकी 23 सामने जिंकणं हा काही विनोद नाही.’

रोहित शर्माने टीकाकारांना सुनावलं

टीकाकारांवर बोलताना रोहित शर्माने सांगितलं की, ‘टीका व्हायला हवी, काही हरकत नाही. आपण घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध हरलो. त्यावर टीका योग्य आहे. पण टीका करण्याची एक पद्धत असते. आज एक प्रकारचा अजेंडा चालवून टीका केली जाते. हे काही योग्य नाही.’ दरम्यान, रोहित शर्माला कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घ्यायची नव्हती अशी चर्चा रंगली आहे. इंग्लंडमध्ये दोन कसोटी सामने खेळण्याची इच्छा होती. त्यानंतर कर्णधारपद सोडेल असा प्रस्ताव दिल्याची चर्चा होती. पण बीसीसीआयने हा प्रस्ताव नाकारला आणि त्याने निवृत्ती जाहीर केली अशी चर्चा क्रीडाप्रेमी करत आहेत.