
IPL 2024 मध्ये या वर्षी अनेक टीम्सनी कॅप्टन बदलले. पण सर्वाधिक चर्चा आहे ती, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सची. कारण या दोन्ही टीम्समध्ये स्टार प्लेयर्सची संख्या जास्त आहे. मुंबईने आपला यशस्वी कॅप्टन रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याची त्याच्याजागी नियुक्ती केली. तेच चेन्नई सुपर किंग्सने एमएस धोनीच्या जागी ऋतुराज गायकवाडची निवड केली. दोन्ही टीम्सनी प्रत्येकी पाचवेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. पण CSK मध्ये जितक्या सहजतेने कॅप्टनशिपच हस्तांतरण झालं, तितकाच मुंबई इंडियन्समध्ये गोंधळ आहे. हार्दिक पांड्या-रोहित शर्माने धोनी-ऋतुराजकडून टीमची गाडी रुळावर आणण्यासाठी काय बोध घेतला पाहिजे? ते जाणून घेऊया.
CSK चा कॅप्टन म्हणून ऋतुराज गायकवाडचे भले हे सुरुवातीचे दिवस आहेत. पण धोनीची जागा घेण्यासाठी आपण सक्षम उत्तराधिकारी आहोत, हे त्याने दाखवून दिलय. धोनी आणि रवींद्र जाडेजाच्या उपस्थितीत ऋतुराज प्रभावशाली दिसतोय. गायकवाडने मैदानावर घेतलेल्या काही निर्णयांनी इम्पॅक्ट केला. उदहारणार्थ, गुजरात टायटन्स विरुद्ध 19 व्या ओव्हरमध्ये डेब्यूटेंट समीर रिजवीला जाडेजाच्या आधी वर पाठवणं. महत्त्वाच म्हणजे धोनी ऋतुराजवर डोळे बंद करुन विश्वास ठेवतो. मुंबई इंडियन्सची केस वेगळी आहे. रोहित आणि हार्दिक मधल्या कोल्ड वॉरमुळे मुंबई इंडियन्स टीमचा अनप्रोफेशनलपणा दिसून येतोय. दोन्ही खेळाडूंमधील बाँडिंग महत्त्वाच आहे.
मुंबई आणि चेन्नईमध्ये फरक आहे, तो हाच
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्सचा एक समृद्ध महान इतिहास आहे. रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला पाचवेळा चॅम्पियन बनवलय. धोनीने सुद्धा इतक्याच वेळा सीएसकेला आयपीएलचा किताब जिंकून दिलाय. पण चेन्नई फ्रेंचायजी आणि त्यांच्या मालकांना माहित आहे की, महान खेळाडूंचा आदर कसा ठेवला जातो. वारसा कसा संभाळला जातो. कसा योग्य सन्मान द्यायचा. कॅप्टन बदलण एक सततची प्रक्रिया आहे. पण त्याची सुद्धा एक पद्धत असते. मुंबई इंडियन्सने तडकाफडकी रोहित शर्माला कॅप्टनशिपवरुन हटवून हार्दिक पांड्याकडे नेतृत्व सोपवलं. तेच चेन्नईने धोनीवर आपला उत्तराधिकारी निवडण्याची जबाबदारी सोपवली होती.