
टीम इंडियाचे माजी खेळाडू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी ऑलरांउंडर रवींद्र जडेजा याच्याबाबत पुन्हा एकदा विधान केलं आहे. मांजरेकरांनी इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याआधी रवींद्र जडेजाच्या आकडेवारीचा उल्लेख करत कर्णधार शुबमन गिल याने दुसऱ्या पर्यायाचा विचार करावा, असा सल्ला दिला. तसेच मांजरेकरांनी जडेजाच्या इंग्लंड विरूद्धच्या कामगिरीवरूनही प्रश्न उपस्थित केले.
मांजरेकरकांनुसार, जडेजाची इंग्लंड विरुद्धची कामगिरी चांगली नाही. त्यामुळे कर्णधार शुबमन याने दुसर्या फिरकी गोलंदाजांबाबत विचार करावा, असं मांजरेकरांनी म्हटलं. मात्र त्यानंतरही शुबमनने जडेजाचा प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश केला आहे. रवींद्र जडेजा याला कसोटी क्रिकेटमधील गेल्या काही सामन्यांमध्ये फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. जडेजाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही धावांसाठी संघर्ष करावा लागला होता. त्यामुळेच मांजरेकरांनी जडेजावर निशाणा साधला.
“रवींद्र जडेजा कायमच इंग्लंड विरुद्ध संघर्ष करताना दिसतो. त्यामुळे शुबमन गिल याने फिरकी गोलंदाज म्हणून दुसऱ्या पर्यायांकडे पाहावं”, असं मांजरेकर ईएसपीएनक्रिकइन्फोसोबत म्हणाले. तसेच कुलदीप यादव याला पहिल्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये घ्यावं, असंही मांजरेकर म्हणाले.
जडेजाने आतापर्यंत इंग्लंड विरुद्ध 12 कसोटी सामन्यांमध्ये 29.18 च्या सरासरीने 642 धावा केल्या आहेत. जडेजाने इंग्लंड विरुद्ध 1 शतक करण्यासह 27 विकेट्सही घेतल्या आहेत. मात्र जडेजाला इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेत (india tour of England 2024) काही खास करता आलं नव्हत. जडेजाने तेव्हा 8 डावांमध्ये 19 विकेट्स घेतल्या होत्या.
तसेच जडेजाची सेना (Sena Countries) देशातील कामगिरीही काही खास नाही. जडेजाचा बॉलिंग एव्हरेज 24.24 असा आहे. मात्र जडेजाची सेना देशातील सरासरी ही 38.46 अशी आहे. जडेजाची जून 2021 पासून सेना देशातील सरासरी ही 47.60 अशी आहे. जडेजाला या दरम्यान 11 कसोटी सामन्यांमध्ये 15 विकेट्सच घेता आल्या आहेत. तसेच जडेजाने गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील (Border Gavaskar Trophy 2024-2025) 5 सामन्यांमध्ये 135 धावा करण्यासह 4 विकेट्स घेतल्या होत्या.
दरम्यान मांजरेकरांनी 2019 साली वर्ल्ड कप दरम्यान जडेजाबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. त्यामुळे मांजरेकरांना माफी मागावी लागली होती. तसेच मांजरेकरांना कॉमेंट्री पॅनेलमधून हटवण्यात आलं होतं.
जडेजा बिट्स एन्ड पीस क्रिकेटर (एखाद-दुसऱ्या सामन्यात चांगली कामगिरी करणारा खेळाडू) आहे असं मांजरेकरांनी 2019 च्या वर्ल्ड कप दरम्यान म्हटलं होतं. त्यानंतर जडेजाने मांजरेकरांना ट्विटकरुन सुनावलं होतं. “असं असूनही मी तुमच्यापेक्षा दुप्पट सामने खेळले आहेत आणि आताही खेळत आहे. ज्यांनी काही तरी मिळवलंय त्यांचा सन्मान करायला शिका”, अशा शब्दात जडेजाने मांजरेकरांना प्रत्युत्तर दिलं होतं.