संजू सॅमसनने खरंच चूक केली का? संघाला चांगली सुरूवात की पायावर मारला धोंडा!

India vs Namibia: नामिबिया विरूद्धच्या सामन्यात संजू सॅमसनला नशिबाने साथ दिली. अभिषेक शर्मा आजारी असल्याने त्याची जागा घेतली. त्याने आक्रमक सुरूवात करून दिली पण संघातलं स्थान कायम करण्यात अपयशी ठरला. नेमकं क्रीडाप्रेमींना काय वाटतं? ते जाणून घ्या

संजू सॅमसनने खरंच चूक केली का? संघाला चांगली सुरूवात की पायावर मारला धोंडा!
संजू सॅमसनने खरंच चूक केली का? संघाला चांगली सुरूवात की पायावर मारला धोंडा!
Image Credit source: PTI
| Updated on: Feb 12, 2026 | 8:44 PM

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी अभिषेक शर्माचा जोडीदार संजू सॅमसन असेल यावर शिक्कामोर्तब झालं होतं. पण न्यूझीलंडविरुद्धची पाच सामन्यांची टी20 मालिका संजूच्या जागेसाठी स्पीडब्रेकर ठरली. या मालिकेत हवी तशी कामगिरी करू न शकल्याने संजू सॅमसनने संघातील जागा गमावली. त्यामुळे टी20 वर्ल्डकप बेंचवरच बसून पाहावा लागेल अशी वेळ आली. पण दुसऱ्या टी20 सामन्यापूर्वी ट्विस्ट आला. अभिषेक शर्माची तब्येत बिघडली आणि संजू सॅमसनला प्लेइंग 11 मध्ये जागा मिळाली. खरं तर संजू सॅमसनच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी होती. कारण संजूला संधीचं सोनं करून या स्पर्धेत प्लेइंग 11मध्ये जागा मिळण्याची नामी संधी होती. पण संजू सॅमसनला त्यात अपयश आलं. खरं तर त्याने टीम इंडियाला चांगली सुरूवात करून दिली. मागचा रेकॉर्ड चांगला असता तर त्याची ही खेळी चालून गेली असती. पण त्याला संघात जागा मिळवायची असेल तर मोठी खेळी करण्याशिवाय पर्याय नाही.

संजू सॅमसन नामिबियाविरुद्ध 22 धावांची खेळी करून बाद झाला. त्याने 8 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकार मारत 22 धावा केल्या. त्याने 275 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. त्याने या धावा षटकार आणि चौकाराने केल्या हे विशेष..संजू सॅमसनने पहिले तीन चेंडू निर्धाव घालवले. त्यानंतर चौथ्या चेंडूवर षटकार मारत खातं खोललं. त्यानंतर दुसऱ्या षटकात त्याने आक्रमक बाणा दाखवला. त्याने दोन षटकार आणि एक चौकार मारला. पण पाचव्या चेंडूवर फटका मारताना चुकला आणि झेल बाद झाला. खरं तर बॅटच्या मधोमध फटका लागला होता. पण ताकद नसल्याने मिड विकेटला झेल बाद झाला.

संजू सॅमसनसाठी हा सामना खूपच महत्त्वाचा होता. कारण त्याच्या क्रिकेट कारकि‍र्दीत पहिल्यांदाच टी20 वर्ल्डकप सामना खेळला होता. मागच्या वर्ल्डकप स्पर्धेत संघाचा भाग होता. पण प्लेइंग 11 मध्ये जागा मिळाली नाही. संजू सॅमसनने 31 वर्षे 93 दिवसांचा असताना टी20 वर्ल्डकप स्पर्धेत डेब्यू केलं. टी20 वर्ल्डकपमध्ये डेब्यू करणारा वयस्कर फलंदाज ठरला. संजू सॅमसन पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यातही खेळू शकतो. कारण अभिषेक शर्मा फिट नसल्याचं सूर्यकुमारने आधीच सांगितलं आहे. पण या सामन्यात चूक करून चालणार आहे. कारण हा हायव्होल्टेज सामना असून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. या सामन्यात फेल गेला तर त्याचं टीम इंडियातील करिअर संपुष्टात येईल.