Cricket : 324 विकेट्स घेणाऱ्या भारताच्या स्टार खेळाडूची मोठी घोषणा, थेट टीम बदलली, कुणासाठी खेळणार?
Cricket News : इंग्लंड दौऱ्याआधी भारतीय खेळाडूने सोशल मीडियावरुन मोठी घोषणा केली आहे. स्टार खेळाडूने थेट टीम बदलली असल्याचं जाहीर केलं आहे. जाणून घ्या तो कोण आहे?

टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यात 20 जून ते 4 ऑगस्ट दरम्यान 5 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. तसेच इंडिया ए विरुद्ध इंग्लंड लायन्स यांच्यातील 2 अनऑफिशियल टेस्ट मॅचची सीरिज 0-0 ने बरोबरीत राहिली. यानंतर आता भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. भारताच्या एका खेळाडूने थेट टीम बदलली आहे. भारताचा हा खेळाडू आता नव्या संघासोबत खेळताना दिसणार आहे. तो खेळाडू कोण आहे? हे जाणून घेऊयात.
उत्तर प्रदेशचा स्टार स्पिनर सौरभ कुमार याने डोमेस्टिक सिजनआधी मोठी घोषणा केली आहे. सौरभ कुमार आतापर्यंत यूपी अर्थात उत्तर प्रदेश टीमकडून खेळत होता. मात्र आता येत्या हंगामापासून सौरभ आंध्रप्रदेशचं प्रतिनिधत्व करणार आहे. सौरभने गेल्या काही वर्षांत दमदार बॉलिंगच्या जोरावर देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. सौरभने देशांतर्गत क्रिकेटमध्ये 300 पेक्षा अधिक फर्स्ट क्लास विकेट्स घेतल्या आहेत.
सौरभने सोशल मीडियावरुन आंध्रप्रदेशसाठी खेळणार असल्याचं जाहीर केलं आहे. तसेच सौरभने या पोस्टद्वारे यूपीसीएचे आभार मानले आहेत. “यूपीसीएसोबतच्या गेल्या 10 वर्षांच्या शानदार प्रवासासाठी मी आभार व्यक्त करतो. मला नेतृत्व करण्याची आणि शिकण्याची संधी दिल्याबद्दल मी यूपीसीएबाबत प्रामाणिकपणे कृतज्ञता व्यक्त करतो”, असं सौरभने या पोस्टमध्ये म्हटलंय.
“मी आंध्रप्रदेश क्रिकेट असोसिएशनसह क्रिकेटमधील नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. इथवरच्या प्रवासात माझ्यासोबत असणाऱ्या प्रत्येकाचा मी आभारी आहे. मी आंध्रप्रदेश क्रिकेट असोसिएशनसह जोडल्यांनतर उत्साहित आहे. या नव्या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी मी प्रतिक्षेत आहे”, असं म्हणत सौरभने आपण उत्सूक असल्याचं दाखवून दिलं.
सौरभ कुमारचा मोठा निर्णय
View this post on Instagram
सौरभ कुमारची कारकीर्द
सौरभ कुमार याने 79 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये 26.45 च्या सरासरीने 324 विकेट्स घेतल्या आहेत. सौरभने या दरम्यान 25 वेळा 5 विकेट्स आणि 8 वेळा 10 विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. तसेच सौरभने बॅटिंगनेही धमाका केला आहे. सौरभने 2 शतकं आणि 15 अर्धशतकं झळकावली आहेत. सौरभने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 2 हजार 374 रन्स केल्या आहेत. तसेच सौरभने 39 लिस्ट ए सामन्यांमध्ये 51 तर 33 टी 20 सामन्यांमध्ये 24 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच सौरभ कुमारची अनेकदा भारतीय संघात निवड करण्यात आली. मात्र सौरभला आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही.
