
आशिया कप 2025 स्पर्धेत भारताचा पहिला सामना युएईसोबत होत आहे. या सामन्यात भारताचं पारडं जड आहे यात काही शंका नाही. पण या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादव कोणत्या 11 खेळाडूंसह मैदानात उतरणार याची उत्सुकता लागून आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा या संघाचा भाग नसले तरी भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. या संघात तरुण आणि अनुभवी खेळाडूंची सांगड आहे. संघात अभिषेक शर्मा, शुबमन गिल, संजू सॅमसन, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, रिंकु सिंह, सूर्यकुमार यादव, अर्शदीप सिंग, शिवम दुबे आणि अक्षर पटेल ही नावं आहेत. स्थिती अशी आहे की कोणाला खेळवायचं आणि कोणाला बसवायचं? त्यामुळे भारतीय संघ किती मजबूत आहे याचा अंदाज येतो. हा संघ पाहूनच पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटू हवा गूल झाली आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याने भारतीय संघाबाबत दिलेली प्रतिक्रिया व्हायरल होत आहे.
भारत आणि युएई या सामन्यापूर्वी एका पाकिस्तानी न्यूज चॅनेलवर माजी क्रिकेटपटूंचा कार्यक्रम पार पडला. यात शोएब अख्तर, मिस्बाह उल हक, शोएब मलिक आणि उमर गुल सारख्या माजी खेळाडूंनी भाग घेतला. यावेळी शोएब अख्तर भारतीय संघाची स्तुती करताना थांबलाच नाही. शोएब अख्तरने आपलं म्हणणं मांडताना सांगितलं की, ‘बरं.. अभिषेकही आला आहे. बुमराहही आहे. संजू सॅमसनही आहे, शेवटी तिलकही आहे. हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, रिंकु सिंह आहे. शुबमन आहे, सूर्या आहे. शिवम दुबे, अक्षर पटेल आहे. मित्रा ते कोणाला बाहेर बसवतील?’
शोएब अख्तरने विश्लेषण करताना सांगितलं की, भारतीय संघ युएईला सहज मात देईल. ‘हे बघा, आम्हाला माहिती आहे की युएई हरणार आहे. मला वाटतं की थोड्या फरकाने हरणं हा युएईचा विजय असेल. मला हाँगकाँगबाबत तक्रार आहे. काल संध्याकाळी अफगाणिस्तानने त्यांना 94 धावांनी पराभूत केलं. तुम्हाला पराभूतच व्हायचं होतं तर कमीत कमी अंतराने हरायचं ना. म्हणजे तुम्हाला काहीतरी मिळेल. काही तरी लढाऊपणा दाखवा.’