
Shreyas Iyer in Vijay Hazare Trophy: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत श्रेयस अय्यरला जबर दुखापत झाली होती. त्यामुळे तीन महिने मैदानापासून दूर होता. त्याला त्या दुखापतीतून सावरण्यासाठी बराच काळ गेला. आता न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे. त्याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. पण त्याच्या नावापुढे स्टार मार्क केलं आहे. कारण मालिकेपर्यंत फिट अँड फाईन झाला तरच विचार केला जाईल असं त्यातून स्पष्ट सांगण्यात आलं होतं. पण या श्रेयस अय्यरने फिट अँड फाईन असल्याचं दाखवून दिलं आहे. विजय हजारे ट्रॉफीत त्याने आपल्या फलंदाजीचा जलवा दाखवून दिला. विजय हजारे ट्रॉफीत सहाव्या फेरीचे सामने सुरु आहेत. मुंबईविरुद्ध हिमाचल प्रदेश सामन्यात श्रेयस अय्यरने जोरदार कमबॅक केलं. हिमाचल प्रदेशविरुद्ध 82 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 10 चौकार आणि तीन षटकार मारले. म्हणजेच 58 धावा त्याने न धावताच म्हणजेच चौकार षटकाराने मारल्या. या खेळीतून त्याने आपला फॉर्म दाखवून दिला आहे.
श्रेयस अय्यरने संघाला सावरण्यात मोलाची भूमिका बजावली. मुंबईने दोन विकेट स्वस्तात गमावले होते. त्यामुळे संघावर दडपण वाढलं होतं. यशस्वी जयस्वाल 15 आणि सरफराज खान 21 धावा करून बाद झाले होते. पण श्रेयस अय्यरने तिसऱ्या विकेटसाठी मुशीर खानसोबत चांगली भागीदारी केली. अय्यरने सुरूवातीला सावध खेळी केली. त्याने 18 चेंडूत फक्त 8 धावा केल्या. पण खेळपट्टीवर नजर बसली आणि आपल्या भात्यातून एक एक शॉट्स काढले. मयंक डागर, कुशल पाल आणि अभिषेक कुमार या गोलंदाजांवर भारी पडला. 20 चेंडू निर्धाव खेळला असला तरी प्रत्येक चौथ्या चेंडूवर चौकार मारला.
श्रेयस अय्यरसाठी हा फक्त सामनाच नाही तर टीम इंडियातील प्रवेशाची टेस्ट होती. अखेर श्रेयसने ही टेस्ट पास केली आहे. त्याने 53 चेंडूत 154.72 च्या स्ट्राईक रेटने 82 धावा केल्या. या खेळीने त्याने आपलं फिटनेस टेस्ट दाखवून दिली आहे. इतकंच काय तर फॉर्मात असल्याचंही दाखवून दिलं आहे. त्याच्या या खेळीच्या जोरावर मुंबईने 33 षटकात 9 विकेट गमवून 299 धावा केल्या आणि विजयासाठी 300 धावांचं आव्हान दिलं.