
अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतील पाच सामन्यात कर्णधार शुबमन गिल आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज चमकले. या दोघांनी जबरदस्त कामगिरी केली. त्यांच्या खेळीमुळे भारताने ही मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. इतर खेळाडूंचही तितकंच योगदान आहे. पण दोघांनी संपूर्ण स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली. गिलने फलंदाजीत सर्वाधिक धावा काढल्या. तर मोहम्मद सिराज हा या मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. शुबमन गिल 754 धावांसह सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. दुसरीकडे, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज एकूण 23 विकेट्ससह आघाडीवर राहिला. या उत्कृष्ट कामगिरीनंतर आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये या दोन्ही खेळाडूंनी मोठी झेप घेतली आहे.
भारताचा कसोटी कर्णधार शुबमन गिल सध्या फलंदाजांच्या क्रमवारीत नवव्या स्थानावर आहे. त्याचे रेटिंग 754 आहे. या मालिकेतील प्रभावी कामगिरीने त्याने टॉप 10 मध्ये स्थान मिळवले आहे. गिल व्यतिरिक्त ऋषभ पंत सातव्या आणि यशस्वी जयस्वाल आठव्या स्थानावर आहे. टॉप 10 मध्ये या तीन भारतीय फलंदाजांची उपस्थिती भारतीय क्रिकेटसाठी चांगलं लक्षण आहे. रवींद्र जडेजा 29व्या स्थानावर आहे आणि केएल राहुल 36 व्या स्थानावर आहे. दरम्यान इंग्लंडचा जो रूट 904 रेटिंगसह पहिल्या स्थानावर आहे.
मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा मोहम्मद सिराज गोलंदाजांच्या क्रमवारीत 27 व्या स्थानावर आहे. त्याचे रेटिंग 605 आहे. जसप्रीत बुमराह पहिल्या स्थानावर आहे. त्याने वर्कलोड मॅनेजमेंटमुळे दोन सामने खेळला नाही. या दोन्ही सामन्यात भारताने विजय मिळवला हे विशेष.. रवींद्र जडेजा 14 व्या स्थानावर आहे. कुलदीप यादव 28 व्या स्थानावर आहे. त्याला या मालिकेत खेळण्याची संधीच मिळाली नाही. पाचही सामन्यात तो बेंचवर बसून होता. वॉशिंग्टन सुंदर 46व्या स्थानावर आहे. दरम्यान सिराजने अशीच कामगिरी सुरू ठेवली तर टॉप 20 मध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रवींद्र जडेजा हा पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्या आसपास देखील कोण नाही. 422 रेटिंगसह पहिलं स्थान मिळवलं आहे. त्याच्या शिवाय टॉप 10 मध्ये कोणीच नाही. तर वॉशिंग्टन सुंदरला या मालिकेत 8 स्थानाचा फायदा झाला. आता तो न्यूझीलंडच्या मॅट हेन्रीसह 193 रेटिंगसह 13व्या स्थानावर आहे.