
आशिया कप 2025 स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर महाअंतिम सामना हा 28 सप्टेंबरला होणार आहे. गतविजेत्या भारतीय संघाकडून यंदाही क्रिकेट चाहत्यांना अनेक आशा आहेत. बीसीसीआय निवड समितीने या स्पर्धेसाठी आतापर्यंत भारतीय संघाची घोषणा केलेली नाही. त्यामुळे आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघात कुणाला संधी मिळणार आणि कुणाला नाही? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून आहे. अशात आता भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज शुबमन गिल याच्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुबमनला आशिया कप स्पर्धेत संधी मिळणार नसल्याचं म्हटलं जात आहे.
रेव्हस्पोर्ट्सनुसार, शुबमनला आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघात संधी मिळणं फार अवघड आहे. भारतीय संघात संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा ही जोडी असल्याने शुबमनला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. संजू आणि अभिषेकने गेल्या काही काळात सातत्याने टी 20I मध्ये चमकदार कामगिरी करत आहेत.
संजूने गेल्या 10 टी 20I सामन्यांमध्ये 3 शतकं लगावली आहेत. तसेच संजूला संधी मिळाल्यास तो ओपनिंग करेल. त्यामुळे ट्रॅक रेकॉर्ड पाहता टीम मॅनेजमेंट संजूच्या बॅटिंग पोजिशनमध्ये बदल करण्यास इच्छूक नसल्याचं म्हटलं जात आहे.
तसेच अभिषेक शर्मा याने वर्षभरात टी 20I संघातील आपलं स्थान कायम केलं आहे. अभिषेकने वर्षभराच्या कारकीर्दीत आपली छाप सोडत अनेक विक्रम केले. अभिषेक आयसीसी टी 20I बॅटिंग रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी आहे. तर रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानी असलेल्या तिलक वर्मा यालाही आशिया कप स्पर्धेसाठी संधी मिळू शकते. त्यामुळे शुबमनला उपकर्णधार केलं तरच त्याला संघात स्थान मिळू शकतं.
रिपोर्ट्सनुसार, आशिया कप स्पर्धेत अक्षर पटेल आणि शुबमन या दोघांची उपकर्णधार म्हणून नावं आघाडीवर आहेत. तसेच नियमित कर्णधार सूर्यकुमार यादव फिट न झाल्यास शुबमनला नेतृत्वाचीही जबाबदारी मिळू शकते, असा दावाही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.
शुबमनने नुकत्याच इंग्लंड विरुद्ध झालेल्या 5 कसोटी सामन्यांमध्ये विक्रमी धावा केल्या. शुबमन या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. शुबमनने 5 सामन्यांमध्ये 75.40 च्या सरासरीने एकूण 754 धावा केल्या. शुबमनला या कामगिरीसाठी मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.