
भारतीय संघ न्यूझीलंडविरूद्धच्या वनडे मालिकेसाठी सज्ज झाला आहे. भारतीय खेळाडू या मालिकेपूर्वी सराव शिबिरात घाम गाळत आहे. पहिल्या सामन्याला अवघे काही तास शिल्लक असताना कर्णधार शुबमन गिल पत्रकार परिषदेला सामोरं गेला. यावेळी त्याने पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. पत्रकारांनी यावेळी त्याला बोचरे प्रश्न विचारले. पण शुबमन गिलने संयमित उत्तरं दिलं. शुबमन गिल टीम इंडियाच्या कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार आहे. तर टी20 मालिकेत त्याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे. पण त्याचा फॉर्म काही चांगला नसल्याने त्याला टी20 संघातून वगळण्यात आलं आहे. इतकंच काय तर टी20 वर्ल्डकप संघातही त्याला स्थान मिळालं नाही. त्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये चर्चा सुरु आहे. असं असताना कर्णधार शुबमन गिलने या प्रश्नांना मोकळी वाट करून दिली.
टी20 वर्ल्डकप संघात स्थान मिळालं नाही याबाबत पत्रकारांनी विचारताच शुबमन गिल म्हणाला की, ‘मी जिथेच जिथे मला असायला हवं आणि माझ्या नशिबात जे काही लिहिलं गेलं आहे ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. खेळाडूला नेहमीच असे वाटते की तो त्याच्या देशासाठी त्याचे सर्वोत्तम देईल आणि निवडकर्त्यांनी त्यांचा निर्णय घेतला आहे. मी त्यांच्या निर्णयाचा आदर करतो आणि संघाला टी20 विश्वचषकासाठी शुभेच्छा देतो.’ टी20 वर्ल्डकप संघातून शुबमन गिलला डावलल्यानंतर अक्षर पटेलची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेपासून आगामी वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेची पायाभरणी केली जाणार आहे. आता फक्त दीड वर्षांचा अवधी शिल्लक असून प्रत्येक वनडे मालिका महत्त्वाची असणार आहे. सध्याची स्थिती पाहता वनडे मालिका शुबमन गिलच्या नेतृत्वात खेळली जाणार असंच दिसत आहे. जर त्याला फलंदाजीत सूर गवसला तर त्यात काहीच शंका नाही. दरम्यान, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनाही या दीड वर्षात सातत्यपूर्ण कामगिरी करणं गरजेचं आहे. कारण त्यांच्या फॉर्मवर आणि देशांतर्गत क्रिकेटमधील खेळीवर संघातील स्थान ठरणार आहे.