
दक्षिण अफ्रिकेविरूद्ध कसोटी, वनडे आणि टी20 मालिका संपल्यानंतर भारतीय संघ आता न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी20 आणि वनडे मालिका होणार आहे. न्यूझीलंडविरुद्धची टी20 मालिकेसाठी संघ आधीच जाहीर केला आहे. पण वनडे मालिकेसाठी अजूनही संघ जाहीर केलेला नाही. या मालिकेसाठी 3 किंवा 4 जानेवारी संघ जाहीर केला जाणार आहे. वनडे मालिका 11 जानेवारीपासून खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यापूर्वीच पाच अपडेट समोर आले आहेत. त्यामुळे वनडे संघात उलथापालथ होणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. श्रेयस अय्यरच्या फिटनेस टेस्टनंतर संघाची घोषणा केली जाणार आहे. तर या संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली असणार हे निश्चित झालं आहे. या दोघांनी दक्षिण अफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेत चांगली कामगिरी केली होती. तसेच विजय हजारे ट्रॉफीतही शतक ठोकत दावा पक्का केला आहे.
शुबमन गिल दुखापतीतून सावरला असून वनडे संघाची धुरा हाती घेण्यास सज्ज झाला आहे. त्यामुळे केएल राहुलकडून पुन्हा एकदा शुबमन गिलच्या हाती सूत्र येणार आहेत. शुबमन गिलच्या गैरहजेरीत केएल राहुलने दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत कर्णधारपद भूषवलं होतं. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत कर्णधार बदलला जाणार हे निश्चित आहे. दुसरीकडे, ऋषभ पंत, यशस्वी जयस्वाल यांचं संघात निवड होणार हे निश्चत आहे. तर गोलंदाजीत हार्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा आणि अर्शदीप सिंग यांना संधी मिळू शकते. तर टी20 वर्ल्डकपच्या दृष्टीने या संघात हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराहला आराम दिला जाईल. मोहम्मद सिराजला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. कारण त्याची निवड टी20 संघात झालेली नाही.
वनडे मालिकेसाठी भारताचा संभाव्य संघ : शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर),ऋषभ पंत (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, रविंद्र जडेजा,कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी,हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह,यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, वॉशिंगटन सुंदर/अक्षर पटेल.