
आगामी आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेआधी एकूण 20 संघ तयारीला लागले आहेत. या स्पर्धेचं आयोजन हे भारत आणि श्रीलंकेत करण्यात आलं आहे. टी 20i स्पर्धेचा (Icc T20I World Cup 2026) थरार हा 7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान रंगणार आहे. टीम इंडिया या स्पर्धेत यजमान आणि गतविजेता म्हणून उतरणार आहे. तसेच श्रीलंका सहयजमान आहे. टीम इंडियासमोर सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात वर्ल्ड कप ट्रॉफी कायम राखणयाचं आव्हान असणार आहे. या स्पर्धेला मोजून काही दिवसांचा अवधी बाकी आहे. बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली.
टीम इंडिया वर्ल्ड कपआधी मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध अखेरची टी 20i मालिका खेळणार आहे. उभयसंघात एकूण 5 टी 20i सामने खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघांसाठी विशेष करुन न्यूझीलंडसाठी आगामी वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ही 5 सामन्यांची मालिका अनेक अर्थाने निर्णायक ठरणार आहे. तर दुसऱ्या बाजूला टी 20i वर्ल्ड कप सहयजमान श्रीलंका मायदेशात पाकिस्तान विरुद्ध टी 20i मालिकेत 2 हात करणार आहे. या मालिकेचं वेळापत्रक आणि इतर काही महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊयात.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध पहलगाम हल्ल्यानंतर प्रचंड ताणले गेले आहेत. त्यामुळे पाकिस्तानचे टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने हे श्रीलंकेत होणार आहेत. अशात पाकिस्तानसाठी वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर होणारी ही टी 20i मालिका अनेक हिशोबाने फायदेशीर ठरणार आहे. या निमित्ताने पाकिस्तानला खेळपट्टी आणि परिस्थितीचा अंदाज येईल. तर श्रीलंकेला पाकिस्तानची पडती आणि जमेची बाजूही समजेल.
श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 7 ते 11 जानेवारी दरम्यान ही टी 20i मालिका खेळवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे एकाच मैदानात या तिन्ही क्रिकेट सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. हे सामने रणगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत.
पहिला सामना, 7 जानेवारी, दांबुला
दुसरा सामना, 9 जानेवारी, दांबुला
तिसरा सामना, 11 जानेवारी, दांबुला
दरम्यान पाकिस्तान श्रीलंकेविरुद्ध या मालिकेत आगामी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर कशी कामगिरी करते? याकडे टीम मॅनेजमेंटचं लक्ष असणार आहे. तसेच या मालिकेत चमकदार कामगिरी करुन खेळाडूंकडे टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आपला दावा मजबूत करण्याची संधी आहे.