
सय्यद मुश्ताक अली 2025 स्पर्धेत गुजरात आणि बडोदा या संघात आमनासामना झाला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल बडोद्याच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय काही अंशी योग्य ठरला असंच म्हणावं लागेल. कारण गुजरातचा संघ 20 षटकं पूर्ण खेळू शकला नाही. 14.1 षटकात सर्व गाडी गमवून 73 धावा केल्या. तसेच बडोद्यासमोर विजयासाठी फक्त 74 धावांचं आव्हान ठेवलं आहे. बडोद्याने हे आव्हान 2 गडी गमवून 6.4 षटकात पूर्ण केलं. म्हणजेच अवघ्या 40 चेंडूत संघाला विजय मिळवून दिला. या विजयात हार्दिक पांड्याचं मोठं योगदान राहिलं. कारण त्याने गुजरातविरुद्ध भेदक गोलंदाजी केली. त्याने 4 षटकात 16 धावा देत एक विकेट घेतला. यावेळी त्याचा इकोनॉमी रेट हा फक्त 4 चा होता. म्हणजेच प्रति षटकं त्याने 4 धावा दिल्या.
हार्दिक पांड्याने एकमेव विकेट घेतली ती म्हणजे उर्विल पटेलची.. खरं तर ही विकेट खूपच महत्त्वाची होती. कारण त्याने याच स्पर्धेत 31 चेंडूत शतक ठोकलं होतं. उर्विलची विकेट पडताच गुजरातचा संघ पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला. गुजरातकडून आर्य देसाईने सर्वाधिक 22 धावा केल्या. तर हेमांग पटेलने 13 धावा करत दुहेरी आकडा गाठला. या व्यतिरिक्त एकही फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकलं नाही. उर्विल पटेल 7, ध्रुश्मंत सोनी 4, सौरव चौहान 7, उमंग कुमार 0, विशाल जयस्वाल 5, रिपल पटेल 2, जपांज्ञ भट्ट 9 आणि रवि बिश्नोई 0 धावांवर बाद झाला. बडोद्याकडून राम लिंबानीने फक्त 5 धावा देत 3 गडी बाद केले.
गुजरातने विजयासाठी दिलेल्या 74 धावांचा पाठलाग करण्यासाठी शशावत रावत आणि विष्णु सोलंकी ही जोडी मैदानात उतरली होती. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी केली. विष्णु सोलंकी 15 चेंडूत 27 धावा करून बाद झाला. त्यानंतर हार्दिक पांड्या आला आणि 6 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 10 धावा करून बाद झाला. त्यानंतर शशावत रावत आणि जितेश शर्मा यांनी विजयी भागीदारी केली. शशावत रावतने 19 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने नाबाद 30 आणि जितेश शर्माने नाबाद 1 धावाची खेळी केली.