
टीम इंडियाने 6 डिसेंबरला तिसरा आणि अंतिम सामना जिंकला. टीम इंडियाने या विजयासह दक्षिण आफ्रिकेविरुद्धची 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका 2-1 ने खिशात घातली. टीम इंडिया त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 मॅचची वनडे सीरिज खेळणार आहे. तर रोहित शर्मा आणि विराट कोहली ही अनुभवी जोडी देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहेत. रोहित शर्मा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Smat 2025) स्पर्धेतील बाद फेरीत खेळणार असल्याचं म्हटलं जात आहे. तर विराटे तो विजय हजारे ट्रॉफीत खेळण्यासाठी उपलब्ध असल्याचं डीडीसीएला (DDCA) कळवलं आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना या दिग्गजांच्या देशांतर्गत क्रिकेटमधील कमबॅकची प्रतिक्षा आहे. त्याआधी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत विराटने 5 सिक्स ठोकून टीमला जिंकवलं आहे. मात्र हा विराट कोहली नसून सिंह आहे.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत डी ग्रुपमधील झारखड विरुद्ध राजस्थान आमनेसामने होते. झारखंडने या सामन्यात राजस्थानवर एकतर्फी विजय मिळवला. झारखंडने हा सामना 36 धावांनी आपल्या नावावर केला. विराटने झारखंडच्या विजयात बॅटिंगने प्रमुख भूमिका बजावली. विराटने 36 बॉलमध्ये 69 रन्स केल्या. विराटने या खेळीत 5 षटकार आणि 4 चौकार लगावले. अर्थात विराटने षटकार आणि चौकारांच्या मदतीने 46 धावा केल्या.
ओपनिंगला आलेल्या विराटव्यतिरिक्त कुमार कुशाग्र यानेही अर्धशतक ठोकलं. कुमारने 55 धावा केल्या. तर रॉबिन मिंझ याने 58 धावा केल्या. या तिघांच्या अर्धशतकी तडाख्याच्या जोरावर झारखंडने 200 पार मजल मारली. झारखंडने राजस्थानसमोर 216 धावांचं आव्हान ठेवलं. मात्र राजस्थानचं 179 रन्सवर पॅकअप झालं.
त्यानंतर राजस्थानला हा क्रिकेट सामना जिंकवण्यासाठी फलंदाजांनी खूप जोर लावला. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. राजस्थानच्या करण लांबा याने 52 धावा केल्या. दीपक हुड्डा याने 28 तर महिपाल लोमरोर- मुकुल चौधरी या दोघांनी प्रत्येकी 25-25 धावांचं योगदान दिलं. मात्र इतरांना काही खास करता आलं नाही. झारखंडने अशाप्रकारे राजस्थानच्या डावाला 179 धावावंर ब्रेक लावला. झारखंडसाठी अनुकूल रॉय आणि सुशांत मिश्रा या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. तर राजनदीप याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
झारखंडने राजस्थानवर मात करत विजयी घोडदौड कायम राखत सलग सातवा विजय मिळवला. झारखंडने यासह क्वार्टर फायनलमध्ये धडक दिली. तसेच या पराभवानंतरही राजस्थाननेही उपांत्यपूर्व फेरीचं तिकीट मिळवलं आहे. राजस्थानने 7 पैकी 6 सामने जिंकले आहेत.