SA vs ENG : इंग्लंडच्या खात्यात ‘झिरो बॅलन्स’, चॅम्पियन्स ट्रॉफीत पराभवाची हॅटट्रिक, दक्षिण आफ्रिका विजयासह उपांत्य फेरीत
Icc Champions Trophy 2025 South Africa vs England Match Result : इंग्लंडची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत नाचक्की झाली आहे. इंग्लंडला या स्पर्धेत साखळी फेरीतील एकही सामना जिंकता आला नाही. दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडविरुद्ध 7 विकेट्सने विजय मिळवला. इंग्लंडने अशाप्रकारे पराभवाची हॅटट्रिक पूर्ण केली.

इंग्लंड क्रिकेट टीमचा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मोहिमेतील शेवटही पराभवानेच झाला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील 11 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड आमनेसामने होते. इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 180 धावांचं आव्हान दिलं होतं. दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान 29.1 ओव्हरमध्ये फक्त 3 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. दक्षिण आफ्रिकेने अशाप्रकारे 7 विकेट्सने विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने यासह उपांत्य फेरीत अधिकृतरित्या आणि स्वत:च्या जोरावर प्रवेश मिळवला. तर कर्णधार म्हणून जोस बटलर याच्या कारकीर्दीचा शेवट पराभवाने झाला. जोस बटलरच्या नेतृत्वात इंग्लंडला या स्पर्धेत विजयाचं खातंही उघडता आलं नाही.
दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग
दक्षिण आफ्रिकेच्या 4 फलंदाजांनी विजयात योगदान दिलं. तर एकाला भोपळाही फोडता आला नाही. ट्रिस्टन स्टब्स झिरोवर आऊट झाला. तर त्यानंतर रायन रिकेल्टन, रॅसी व्हॅन डर ड्यूसेन, हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर या चौघांनी योगदान दिलं आणि दक्षिण आफ्रिकेला विजयापर्यंत पोहचवलं.
ट्रिस्टन स्टब्स पाचव्या बॉलवर भोपळा न फोडता माघारी गेला. रायन रिकेल्टन याने 25 बॉलमध्ये 5 फोरसह 27 रन्स केल्या. हेन्रिक क्लासेन याने 56 चेंडूमध्ये 11 चौकारांसह 64 धावांचं योगदान दिलं. तर रॅसी व्हॅन डर ड्यूसेन आणि मिलर या जोडीने दक्षिण आफ्रिकेला विजयापर्यंत पोहचवलं. रॅसी व्हॅन डर ड्यूसेन याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. रॅसी याने 87 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 6 फोरसह नॉट आऊट 72 रन्स केल्या. तर मिलरने 2 बॉलमध्ये 1 सिक्ससह नॉट आऊट 7 रन्स केल्या. तसेच दक्षिण आफ्रिकेकडून जोफ्रा आर्चर याने 2 विकेट्स घेतल्या. तर आदिल रशीदने 1 विकेट मिळवली.
दक्षिण आफ्रिकेचा विजय
Rassie van der Dussen & Heinrich Klaasen get the job done for South Africa in the chase 💥#ChampionsTrophy #SAvENG ✍️: https://t.co/6ppCgdfPpj pic.twitter.com/1kyqzhc3Gm
— ICC (@ICC) March 1, 2025
इंग्लंडच्या पराभवाची हॅटट्रिक
इंग्लंडने यासह पराभवाची हॅटट्रिक पूर्ण केली. इंग्लंडला 22 फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 350 पेक्षा अधिक धावा करुनही 5 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं. त्यानंतर अफगाणिस्तानने 26 फेब्रुवारीला थरारक सामन्यात इंग्लंडवर 8 धावांनी विजय मिळवला. तर आता दक्षिण आफ्रिकेने 7 विकेट्सने मात केली. बटलर याने इंग्लंडच्या 2 पराभवानंतर कर्णधारपदाचा राजीनामा दिला. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना हा बटलरचा कर्णधार म्हणून शेवटचा सामना होता. बटलर कॅप्टन म्हणून इंग्लंडला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. त्यामुळे इंग्लंडवर रिकामी हाताने मायदेशी परतण्याची वेळ आढावली आहे.
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जोस बटलर (कर्णधार), फिलिप सॉल्ट, बेन डकेट, जेमी स्मिथ (विकेटकीपर), जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि साकिब महमूद.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: एडन मारक्रम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, रायन रिकेल्टन, रॅसी व्हॅन डर ड्यूसेन, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा आणि लुंगी एन्गिडी.
