
सनरायजर्स हैदराबादचा युवा आणि विस्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा याने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 27 व्या सामन्यात पंजाब किंग्सविरुद्ध 246 धावांचा पाठलाग करताना शतकी खेळी केली. त्यामुळे हैदराबादने हा सामना 8 विकेट्सने सहज जिंकला. हैदराबाद हा सामना इतक्या सहज जिंकेल, असा विचारही कुणी केला नसेल. मात्र अभिषेकच्या खेळीमुळे हे शक्य झालं. अभिषेकने 141 धावांची खेळ केली. अभिषेकने यासह अनेक रेकॉर्ड ब्रेक केले. अभिषेकने नक्की काय विक्रम केले? जाणून घेऊयात.
अभिषेकने पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई केली. अभिषेकने अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक केलं. तर पुढील 21 चेंडूत शतक झळकावलं. अभिषेकने आयपीएल कारकीर्दीतील पहिलंवहिलं शतक हे 40 चेंडूत पूर्ण केलं.
अभिषेक यासह सर्वात वेगवान शतक तिसरा भारतीय फलंदाज ठरला. अभिषेकच्या याआधी प्रियांश आर्या आणि युसूफ पठाण या दोघांनी ही कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये वेगवान शतकाचा विक्रम हा युसूफ पठाणच्या नाववर आहे. युसूफने 37 बॉलमध्ये शतक ठोकलेलं. तर प्रियांश आर्याने 39 चेंडूत शतक झळकावलं.
अभिषेक आयपीएलमध्ये एका सामन्यात सर्वाधिक धावा करणारा पहिला भारतीय तर एकूण तिसरा फलंदाज ठरला. अभिषेकने केएल राहुल याचा 132 धावांचा रेकॉर्ड ब्रेक करत हा बहुमान मिळवला.
अभिषेकने 141 धावांच्या खेळीत 10 षटकार लगावले. सोप्या भाषेत सांगायचं तर अभिषेकने 141 पैकी 60 धावा या षटकारांच्या मदतीने केल्या. अभिषेक यासह आयपीएल स्पर्धेत एका सामन्यात सर्वाधिक षटकार लगावणारा संयुक्तरित्या दुसरा फलंदाज ठरला. एका सामन्यात भारतीय फलंदाज म्हणून सर्वाधिक 11 सिक्सचा विक्रम हा मुरली विजय याच्या नावावर आहे. तर त्यानंतर संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, शुबमन गिल यांच्यासह आता अभिषेकचं नाव जोडलं गेलं आहे.
ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या दोघांनी 246 धावांचा पाठलाग करताना सलामी दिली. या दोघांनी 171 धावांची सलामी भागीदारी केली. या दोघांनी यासह इतिहास घडवला. हेड आणि अभिषेकने हैदराबादसाठी केलेली ही दुसरी सर्वात मोठी सलामी भागीदारी ठरली. हैदराबादसाठी डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टो या जोडीने 2019 साली 185 धावांची विक्रमी भागीदारी केली होती.
सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, जीशान अन्सारी, मोहम्मद शमी आणि एशान मलिंगा.
पंजाब किंग्स प्लेइंग ईलेव्हन : प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, नेहल वढेरा, ग्लेन मॅक्सवेल, शशांक सिंग, मार्को जॅनसेन, अर्शदीप सिंग, लॉकी फर्ग्युसन आणि युझवेंद्र चहल.