Asia Cup 2025 : काही तासांपूर्वी डच्चू, आता संधी, श्रीलंका टीम जाहीर, अनफिट खेळाडूचा समावेश, कोण आहे तो?

Sri Lanka Sqaud For Asia Cup 2025 : श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आशिया कप स्पर्धेसाठी 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. श्रीलंका आशिया कप मोहिमेतील आपला पहिला सामना केव्हा खेळणार? जाणून घ्या.

Asia Cup 2025 : काही तासांपूर्वी डच्चू, आता संधी, श्रीलंका टीम जाहीर, अनफिट खेळाडूचा समावेश, कोण आहे तो?
Sri Lanka Cricket Team
Image Credit source: PTI
| Updated on: Aug 28, 2025 | 8:40 PM

आशिया कप 2025 स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सहभागी 8 संघाकडून जोरदार तयारी सुरु आहे. या स्पर्धेत सहभागी होणारे संघ जोरदार तयारी करत आहेत. आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच 8 संघ सहभागी होणार आहेत. तसेच ओमानची या स्पर्धेत खेळण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. यूएईकडे या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान आहे. ए ग्रुपमध्ये भारत, पाकिस्तान, यूएई आणि ओमानचा समावेश आहे. तर बी ग्रुपमध्ये बांगलादेश, हाँगकाँग, श्रीलंका आणि अफगाणिस्तान आहे. या स्पर्धेसाठी सातवा संघ जाहीर करण्यात आला आहे. श्रीलंकेच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. श्रीलंका क्रिकेट या एक्स सोशल मीडिया पेजवरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

आधी डच्चू आता संधी

चरिथ असलंका आशिया कप स्पर्धेत श्रीलंकेचं नेतृत्व करणार आहे. निवड समितीच्या एका निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांना शॉकही लागला आहे तसेच दिलासाही मिळाला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून काही तासांपूर्वी झिंबाब्वे दौऱ्यातील 3 सामन्यांच्या टी 20i मालिकेसाठी संघ जाहीर केला. या संघात ऑलराउंडर वानिंदुचा दुखापतीमुळे समावेश करण्यात आला नाही. मात्र काही तासांनंतर आशिया कप स्पर्धेसाठी आता वानिंदुला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे वानिंदु आशिया कपपर्यंत फिट होतो का? याकडेच क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.

झिंबाब्वेनंतर यूएई

श्रीलंका आशिया कपआधी झिंबाब्वे दौऱ्यात 2 एकदिवसीय आणि 3 टी 20i सामने खेळणार आहे. श्रीलंका त्यानंतर आशिया कप स्पर्धेसाठी दुबईला पोहचणार आहे. श्रीलंका आशिया कप स्पर्धेत आपला पहिला सामना 13 स्पटेंबरला खेळणार आहे. श्रीलंका साखळी फेरीत अफगाणिस्तान, बांगलादेश आणि हाँगकाँग विरुद्ध खेळणार आहे. श्रीलंका बांगलादेश आणि अफगाणिस्तान विरुद्ध कशी कामगिरी करते? याकडे क्रिकेट चाहत्यांचा लक्ष असणार आहे.

श्रीलंकेचं आशिया कप 2025 स्पर्धेतील वेळापत्रक

पहिला सामना, विरुद्ध बांगलादेश, 13 सप्टेंबर, अबुधाबी

दुसरा सामना, विरुद्ध हाँगकाँग, 15 सप्टेंबर, अबुधाबी

तिसरा सामना, विरुद्ध अफगाणिस्तान, 18 सप्टेंबर, अबुधाबी

आशिया कप 2025 स्पर्धेसाठी श्रीलंका टीम : चरिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल मेंडीस, कुसल परेरा, नुवानिदु फर्नांडो, कामिंडु मेंडीस, कामिल मिशारा, दासुन शनाका, वानिंदु हसरंगा, दुनिथ वेल्लालगे, चामिका करुणारत्ने, महीश तीक्षणा, दुष्मंता चमीरा, बिनूरा फर्नांडो, नुवान तुषारा आणि मथीषा पथीराणा.