
आयपीएल 2024 स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. दोन दिवसात चारही प्लेऑफमधील संघांचं नाव स्पष्ट होईल. कोलकाता नाईट रायडर्सनंतर राजस्थान रॉयल्स हा संघ 100 टक्के प्लेऑफमध्ये पोहोचेल. दुसरीकडे, आयपीएल स्पर्धा सुरु असताना टी20 वर्ल्डकप स्पर्धेचे वेध लागले आहेत. त्यामुळे आयपीएल फ्रेंचायसी अडचणीत आल्या आहेत. कारण टी20 स्पर्धेच्या तयारीसाठी दिग्गज खेळाडू आयपीएल सोडून मायदेशी जाण्यावर भर देत आहेत. त्यांच्या या निर्णयाने आयपीएल फ्रेंचायसी नाराज झाल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रीय कर्तव्य आणि आयपीएल यांच्यात चर्चांना उधाण आलं आहे. ही स्थिती पाहून माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे. त्यांनी असं वागणाऱ्या खेळाडूंना खडे बोल सुनावले आहेत. तसेचे बीसीसीआयकडे या खेळाडूंवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
बांगलादेशचा डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिझुर रहमान चेन्नई सुपर किंग्स फ्रेंचायसी सोडून मायदेशी परतला आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स संघ अडचणीत आला आहे. तसेच इंग्लंडचे काही खेळाडू मायदेशी जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आयपीएलवर पुन्हा एकदा खेळाडूंचं संकट घोंघावू लागलं आहे. आता सुनील गावस्कर यांनी मिड डे मध्ये लिहिलेल्या लेखात याबाबत राग व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितलं की, “आयपीएल आधी राष्ट्रीय कर्तव्य या नितीच्या विरोधात नाही. पण खेळाडूंनी पूर्ण स्पर्धेत खेळण्याचं आश्वासन दिलं होतं आणि त्यांच्या बोर्डने त्याने तशी परवानगी दिली होती. मग ते असं अचानक जाऊ शकत नाहीत.”
सुनील गावस्कर यांचं म्हणणं आहे की, “खेळाडू तरीही असं करतात. त्यामुळे फ्रेंचायसीकडे त्यावर कारवाई करण्याची पॉवर असायला हवी. बीसीसीआयने या खेळाडूंची सॅलरी कापण्याची पॉवर द्यायला हवी.” सुनील गावस्कर यांनी फक्त खेळाडूंनाच नाही तर त्यांच्या क्रिकेट मंडळानाही दोषी धरलं आहे. यामुळे फ्रेंचायसीचं मोठं नुकसान झालं आहे. गावस्कर यांनी खेळाडूंसोबत क्रिकेट मंडळाला मिळणाऱ्या कमिशन कापण्याचा प्रस्ताव दिला आहे.
सुनील गावस्कर यांच्या मते, जगातील सर्वात मोठी लीग असलेल्या आयपीएलसोबत हा भेदभाव केला जात आहे. इतर लीगमध्ये फ्रेंचायसी क्रिकेट मंडळांना कमिशन देत नाहीत. पण आयपीएल अपवाद आहे. विदेशी खेळाडूंच्या क्रिकेट मंडळांना 10 टक्के कमिशन फी द्यावी लागते.