पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत सूर्यकुमार यादवने सांगितली ‘मन की बात’, ट्रॉफीबाबत स्पष्ट केलं की…

आशिया कप स्पर्धेत भारताने दैदिप्यमान कामगिरी करत जेतेपदावर नाव कोरलं. या स्पर्धेत भारताने एकही सामना गमावला नाही. इतकंच काय तर पाकिस्तानला तीन वेळा धोबीपछाड दिला. यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत सूर्यकुमार यादवने सांगितली मन की बात, ट्रॉफीबाबत स्पष्ट केलं की...
पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत सूर्यकुमार यादवने सांगितली 'मन की बात', ट्रॉफीबाबत स्पष्ट केलं की...
Image Credit source: Getty Images/TV9 Network
| Updated on: Sep 29, 2025 | 5:36 PM

आशिया कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा अपेक्षेप्रमाणे धुव्वा उडवला. अंतिम सामन्यात भारताची स्थिती पॉवर प्लेमध्ये नाजूक झाली होती. पण तिलक वर्माने संजू सॅमसन आणि शिवम दुबेच्या मदतीने विजयश्री खेचून आणला. भारताने हा सामना 5 गडी राखून जिंकला. भारताने पाकिस्तानला या स्पर्धेत तिसऱ्यांदा पराभूत केलं. या विजयानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून संघाचं अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाने क्रिकेटच्या मैदानात ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्याचं ट्वीट केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्वीटवर कर्णधार सूर्यकुमार यादव याने भाष्य केलं आहे. सूर्यकुमारने सांगितलं की, ‘देशाचे नेते स्वत: फ्रंटफूटवर फलंदाजी करतात तेव्हा छान वाटते. असं वाटलं की त्यांनी स्ट्राईक घेतला आणि धावा काढल्या. जेव्हा पंतप्रधान समोर असतील तेव्हा खेळाडू निश्चितपणे निर्धास्तपणे खेळतील.’

दुसरीकडे, आशिया कप जेतेपदानंतर मैदानात भलतंच नाटक पाहायला मिळालं. भारतीय संघाने नकवीच्या हातून ट्रॉफी घेणार नाही हे स्पष्ट केलं. पण तरीही नकवी निर्लज्जपणे स्टेजवर आला. तसेच ट्रॉफी मीच देणार या भूमिकेवर अडून राहिला. भारतीय खेळाडूंनी ट्रॉफी घेतलीच नाही. इथपर्यंत सर्व काही ठीक होतं. पण नकवी ट्रॉफी आणि सर्व मेडल सोबत हॉटेलमध्ये घेऊन गेला. यामुळे भारतीय संघाने ट्रॉफीशिवाय सेलीब्रेशन केलं. सूर्यकुमार यादवने याबाबत सांगितलं की, ट्रॉफीबाबत जे काही झालं त्याला मी वाद म्हणणार नाही. तुम्ही पाहीलं असेल की लोकांनी ट्रॉफीचे फोटो इकडे तिकडे पोस्ट केले आहेत. पण मन जिंकणं ही खरी ट्रॉफी ठरते. खरी ट्रॉफी मैदानात उपस्थित असलेल्या इतक्या साऱ्या लोकांनी मेहनत आणि प्रयत्न आहे.

आशिया कप स्पर्धेबाबत बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला की, जेव्हा तुम्ही कोणतीही स्पर्धा एकही सामना न गमावता जिंकता तेव्हा चांगलं वाटतं. संपूर्ण संघासाठी आणि संपूर्ण देशासाठी ही एक उत्तम अनुभूती होती आणि ती खूप मजेदार होती. विजयानंतर आम्ही सर्व खेळाडू रात्री एकत्र बसलो आणि खूप मजा केली. आता भारत आणि पाकिस्तान हे संघ आयसीसी 2026 स्पर्धेत भिडतील. ही स्पर्धा पुढच्या वर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणार आहे. भारत आणि श्रीलंकेकडे या स्पर्धेचं यजमानपद आहे. पाकिस्तानचे सर्व सामने हे श्रीलंकेत होणार आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान सामन्यासाठी क्रीडाप्रेमींना चार महिने वाट पाहावी लागणार आहे.