AUS vs IND: दिग्गज क्रिकेटला करणार अलविदा! टीम इंडिया विरुद्ध खेळणार अखेरचा सामना

India vs Australia: टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यासाठी क्रिकेट चाहते उत्सुक आहेत. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूसाठी टीम इंडिया विरुद्धचा हा सामना अखेरचा असणार असल्याची शक्यता आहे.

AUS vs IND: दिग्गज क्रिकेटला करणार अलविदा! टीम इंडिया विरुद्ध खेळणार अखेरचा सामना
ind vs aus team
| Updated on: Jun 24, 2024 | 5:52 PM

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर 8 चा थरार अंतिम टप्प्यात आहे. बी ग्रुपमधून इंग्लंड पाठोपाठ आता दक्षिण आफ्रिकेने सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. त्यानंतर आता आज 24 जून रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात सामना होणार आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून सेमी फायनलमध्ये पोहचण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियासाठी हा करो या मरो असा सामना आहे. ऑस्ट्रेलिया पराभूत झाल्यास त्यांचं आव्हान संपुष्टात येईल. तर इथे ऑस्ट्रेलियाचा पराभव झाल्यास डेव्हिड वॉर्नरचा अखेरचा टी 20 सामना ठरेल, कारण त्याने आधीच वनडे-टेस्ट निवृत्तीनंतर टी 20 वर्ल्ड कप 2024 नंतर क्रिकेटला रामराम करणार असल्याचं म्हटलं होतं.

वर्ल्ड कपआधीच घोषणा

वॉर्नरने टी 20 वर्ल्ड कप 2024 आधीच म्हटलं होतं की निवृत्त होणार असल्याच्या विचाराने मला दिलासा आहे. मला क्रिकेट चाहते अशा खेळाडूच्या रुपात पाहतिल ज्याने आपल्या आक्रमक बॅटिंगने खेळ बदलण्याचा प्रयत्न केला. कमबॅकनंतर 2018 पासून मी एकमेव असा खेळाडू आहे, ज्याला टीकेचा सामना करावा लागला, असंही वॉर्नरने म्हटलं होतं.

वॉर्नरने त्याच्यावर करण्यात आलेल्या टीकेबाबतच्या विधानामागे 2018 चा संदर्भ आहे. वॉर्नरवर सँडपेपर गेट प्रकरणी 1 वर्षासाठी बंदी टाकण्यात आली होती. त्यानंतर वॉर्नरने कमबॅक केलं. त्यानंतर वॉर्नरने उल्लेखनीय कामगिरी केली. वॉर्नरने 2024 च्या सुरुवातीला कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र गरज पडल्यास 2025 साली चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत उपलब्ध असणार आहे.

दरम्यान ऑस्ट्रेलियासाठी सुपर 8 मधील तिसरा आणि टीम इंडिया विरूद्धच्या अखेरच्या सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे. ऑस्ट्रेलिया पराभूत झाली, तर त्यांचं सर्वकाही बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याच्या निकालावर अवलंबून असणार आहे.

ऑस्ट्रेलिया टीम: मिचेल मार्श (कॅप्टन), ॲश्टन आगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर आणि एडम झाम्पा.

टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.