
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत आता सुपर 8 फेरीसाठी जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. आतापर्यंत साखळी फेरीत झालेल्या सामन्यांमध्ये अनेक उलटफेर पाहायला मिळाले. पाकिस्तान, श्रीलंका या सारख्या विश्वविजेत्या संघांना त्यांच्या तुलनेत नवख्या संघांकडून पराभूत व्हावं लागलंय. तर दुसऱ्या बाजूला गतविजेत्या इंग्लंडलाही उर्वरित 2 सामने जिंकल्यानंतरही नेट रनरेटवर सुपर 8 फेरीतील प्रवेश निश्चित होणार आहे. अशात क्रिकेट चाहत्यांना पुढील काही दिवसांमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.
गुरुवारी 12 जून रोजी 2 सामने पार पडले. पहिल्या सामन्यात बी ग्रुपमधील ऑस्ट्रेलियाने नामिबियावर 9 विकेट्सने विजय मिळवून सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवला. तर नामिबियाचं पराभवासह आव्हान संपुष्टात आलं. तसेच याआधीच कॅनडाने सलग 3 सामने गमावल्याने ते आधीच बाहेर पडले आहेत. त्यामुळे आता बी ग्रुपमधून सुपर 8 च्या उर्वरित 1 जागेसाठी स्कॉटलँड आणि इंग्लंड या दोघांमध्ये चुरस आहे. स्कॉटलँडचा 1 सामना बाकी आहे. स्कॉटलँडने 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. तर इंग्लंड विरुद्धच्या सामन्याचा निकाल लागू शकला नाही. त्यामुळे दोघांनाही 1-1 गुण देण्यात आला. त्यामुळे स्कॉटलँडच्या खात्यात एकूण 3 सामन्यांमध्ये 5 गुण आहेत. तसेच त्यांचा नेट रनरेट हा +2.164 असा आहे.
इंग्लंडला आपल्या दुसऱ्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या ऑस्ट्रेलियाकडून 36 धावांनी पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे आता गतविजेत्या इंग्लंडला सुपर 8 मध्ये पोहचायचं असेल, तर उर्वरित 2 सामने चांगल्या अंतराने जिंकावे लागतील. इतकंच नाही, तर स्कॉटलँडचा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या अखेरच्या सामन्यात पराभव व्हावा, अशी प्रार्थना करावी लागणार आहे. त्यामुळे इंग्लंडचंही जरतर वरच अवलंबून आहे.
तर 12 जूनच्या दुसऱ्या सामन्यात डी ग्रुपमधील श्रीलंका विरुद्ध नेपाळ आमनेसामने होते. हा सामान पावसामुळे रद्द झाला आणि दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात आला. श्रीलंकेचा हा तिसरा सामना होता. आता श्रीलंकेचा एकमेव सामना शेष आहे. तर या डी ग्रुपमधून दक्षिण आफ्रिकेने सुपर 8 मध्ये धडक दिली आहे. आता एका जागेसाठी बांगलादेश, नेदरलँड्स आणि नेपाळ हे संघ स्पर्धेत आहेत. मात्र श्रीलंकेला इतर संघांच्या तुलनेत सुपर 8ची संधी नाहीच्या बरोबर आहे.
तसेच आज 12 जून रोजी यजमान यूएसए विरुद्ध टीम इंडिया या ए ग्रुपमधील संघांमध्ये सामना होणार आहे. दोन्ही संघ अजिंक्य आहेत. दोन्ही संघांनी पहिल्या 2 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे टीम इंडिया-यूएसए या दोघांपैकी विजयी संघ आज सुपर 8 मध्ये पोहचेल. यूएसएचा पराभव व्हावा, अशी इच्छा पाकिस्तानची सुपर 8 च्या हिशोबाने असणार आहे. त्यामुळे पाकिस्तानचं टीम इंडिया-यूएसए या सामन्याच्या निकालाकडे लक्ष असणार आहे.