T20 World Cup: रोहितने जे काय म्हटलं ते ऑस्ट्रेलियाला खरंच पचणार नाही!

Rohit Sharma On Australia: इंग्लंड विरूद्धच्या सेमी फायनल सामन्याआधी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाबाबत रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.

T20 World Cup: रोहितने जे काय म्हटलं ते ऑस्ट्रेलियाला खरंच पचणार नाही!
rohit sharma press conference
| Updated on: Jun 27, 2024 | 6:51 PM

टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वात आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध दोन हात करणार आहे. हा सामना गयाना येथे आयोजित करण्यात आला आहे. हा सामना आज 27 जून रोजी होणार आहे. कॅप्टन रोहितने या सामन्याआधी पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तर दिली. रोहितने ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यावरुन प्रतिक्रिया दिली. रोहितची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऑस्ट्रेलियाला सुपर 8 फेरीत 3 पैकी 2 सामन्यात पराभूत व्हावं लागलं. ऑस्ट्रेलियाला सुपर 8 मध्ये टीम इंडिया आणि अफगाणिस्तानने पराभूत केलं.

“टीम इंडियासाठी विशेष करुन एक बॅट्समन म्हणून ऑस्ट्रेलिया विरुद्धचा विजय तुझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे?”, रोहितला असा प्रश्न विचारण्यात आला. रोहित हा प्रश्न ऐकून थोडा शांत राहिला आणि मग हसत उत्तर दिलं. “ऑस्ट्रेलिया आता या वर्ल्ड कपचा भाग नाही, हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे”, असं उत्तर रोहितने दिलं. रोहितचं हे उत्तर ऐकून उपस्थितांमध्ये हशा पिकला. तसेच रोहितने कांगारुंचं कौतुकही केलं.

रोहित काय म्हणाला?

“माझ्या हिशोबाने ऑस्ट्रेलिया एक चांगली टीम आहे, यात काहीच शंका नाही. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाने इतक्या स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यांच्या विरुद्ध आम्ही ज्या विश्वासाने बॅटिंग आणि बॉलिंग केली ती आमच्यासाठी सर्वात मोठी बाब होती. याच विश्वासासह आम्ही पुढे जाऊ शकतो”, असं रोहितने म्हटलं.

“ऑस्ट्रेलियासारख्या टीम विरुद्ध खेळता आणि अशा पद्धतीने जिंकता, तेव्हा सर्व काही योग्य होतं. त्यामुळे तुम्हाला आत्मविश्वास मिळतो. तसेच टी 20 फॉर्मेट आत्मविश्वासावरच आधारलेला आहे”, असं रोहितने नमूद केलं.

हिटमॅनची कांगारुंबाबत प्रतिक्रिया

दरम्यान टीम इंडियाने सुपर 8 फेरीत ऑस्ट्रेवियावर 24 धावांनी विजय मिळववा. त्याआधी अफगाणिस्तानने कांगारुंचा 21 धावांनी धुव्वा उडवला होता. तर अफगाणिस्तानने सुपर 8 मधील शेवटच्या सामन्यात बांगलादेशला पराभूत करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. अफगाणिस्तानच्या या विजयासह ऑस्ट्रेलियाचं वर्ल्ड कपमधून पॅकअप झालं. तर पहिल्या सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला पराभूत करत फायनलमध्ये धडक दिली आहे. आता इंडिया-इंग्लंडमधील विजयी संघ दक्षिण आफ्रिके विरुद्ध 2 हात करणार आहे.