टी20 वर्ल्डकप विजेत्या वुमन्स ब्लाइंड क्रिकेट संघासोबत पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’

वुमन्स ब्लाइंड क्रिकेट टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताने जेतेपद पटकावलं. यानंतर सर्वच स्तरातून संघावर कौतुकाचा वर्षाव सुरु झाला. या जेतेपदानंतर भारतीय महिला संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संपूर्ण संघाला आपल्या हाताने मिठाई भरवली.

टी20 वर्ल्डकप विजेत्या वुमन्स ब्लाइंड क्रिकेट संघासोबत पंतप्रधान मोदींची मन की बात
टी20 वर्ल्डकप विजेत्या वुमन्स ब्लाइंड क्रिकेट संघासोबत पंतप्रधान मोदींची 'मन की बात'
Image Credit source: TV9 Network/Hindi
| Updated on: Nov 27, 2025 | 8:47 PM

भारतीय महिला ब्लाइंड क्रिकेट संघाने टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नेपाळला 7 गडी राखून पराभूत केलं. यासह भारतीय संघाने पहिल्या टी20 ब्लाइंग महिला वर्ल्डकप स्पर्धेवर नाव कोरलं. या स्पर्धेत भारताने एकही सामना गमावला नाही हे विशेष… त्यामुळे सर्वच स्तरातून भारतीय महिला संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या विजयानंतर संघाचं कौतुक केलं होतं. संघाची मेहनत, टीमवर्क आणि दृढ निश्चयाबाबत पाठीवरती कौतुकाची थाप दिली होती. त्यानंतर गुरुवारी भारतीय महिला क्रिकेट संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानाच्या दिल्लीतील निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण संघाला हाताने मिठाई भरवून विजयाच्या शुभेच्छा दिल्या. महिला ब्लाइंड संघाने बॅटवर सह्या करत ती बॅट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साइन केलेला बॉल दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेतेपदानंतर ट्विट करत लिहिलं होतं की, “पहिला महिला ब्लाइंट टी20 विश्वचषक जिंकल्याबद्दल संघाचे अभिनंदन. त्याहूनही कौतुकास्पद गोष्ट म्हणजे संपूर्ण मालिकेत ते अपराजित राहिले. ही खरोखरच एक ऐतिहासिक क्रीडा कामगिरी आहे. खेळाडूंनी कठोर परिश्रम, टीमवर्क आणि दृढनिश्चयाचे उत्तम उदाहरण मांडले आहे. प्रत्येक खेळाडू एक विजेता आहे. संघाला त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी माझ्या शुभेच्छा. ही कामगिरी येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देईल.”ही स्पर्धा भारत आणि श्रीलंकेने संयुक्तपणे आयोजित केली होती. या स्पर्धेचे सामने भारतातील दिल्ली आणि बेंगळुरू आणि श्रीलंकेतील कोलंबो येथे खेळले गेले.

महिला ब्लाइंड टी20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नेपाळने प्रथम फलंदाजी करत 114 धावा केल्या. हे लक्ष्य भारतीय संघाने 12 षटकात पूर्ण केलं. भारताकडून फुला सरीने सर्वाधिक नाबाद 44 धावा केल्या. करूणाने 27 चेंडूत एकूण 42 धावांची खेळी केली.