IND vs SA: कसोटी मालिका गमावल्यानंतर कर्णधार ऋषभ पंत चाहत्यांना थेट म्हणाला की…
दक्षिण अफ्रिकेने टीम इंडियाला कसोटी मालिकेत व्हाईट वॉश दिला. दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 ने जिंकली. यामुळे भारतीय क्रीडारसिकांमध्ये संतापाची लाट आहे. दुसरीकडे या पराभवानंतर खेळाडूही निराश दिसले. आता कर्णधार ऋषभ पंतने मन की बात सांगितलं.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली दक्षिण अफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका भारताने गमावली. खरं तर या मालिकेत भारताकडून फार अपेक्षा होत्या. दक्षिण अफ्रिकेला आपल्याच भूमीत 2-0 ने सहज पराभूत करेल असं वाटलं होतं. पण अगदी उलट झालं. दक्षिण अफ्रिकेने भारतीय संघ आणि क्रीडारसिकांचा अपेक्षाभंग केला. भारतीय संघाला भारतातच 2-0 ने पराभवाची धूळ चारली. पहिल्या कसोटी सामन्यात 30 धावांनी पराभव झाला. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात 408 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यामुळे क्रीडारसिकांमध्ये संतापाची लाट आहे. गुवाहाटी कसोटीत फलंदाजीला पूरक खेळपट्टी असताना भारताचा 408 धावांनी पराभव झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या सामन्यात कर्णधारपदाची धुरा ऋषभ पंतच्या खांद्यावर होती. या पराभवानंतर ऋषभ पंतने माफी मागितली आहे. तसेच खूप मेहनत करत पुनरागमन करण्याचं आश्वासनही दिलं आहे.
ऋषभ पंतने सोशल मीडियावर लिहिलं की, ” गेल्या दोन आठवड्यात आपण चांगली कामगिरी केली नाही हे विसरून चालणार नाही. एक संघ म्हणून आणि वैयक्तिक म्हणून, आपल्याला नेहमीच सर्वोच्च पातळीवर कामगिरी करायची असते आणि लाखो भारतीयांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवायचे असते. माफ करा, यावेळी आपण अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही, परंतु खेळ तुम्हाला शिकायला आणि वाढायला शिकवतो, मग तो संघ म्हणून असो किंवा खेळाडू म्हणून. भारताचे प्रतिनिधित्व करणे हा आमच्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे. आम्हाला माहित आहे की हा संघ काय करण्यास सक्षम आहे आणि आम्ही कठोर परिश्रम करू, एकत्र येऊ आणि अधिक मजबूत होऊन परत येऊ. तुमच्या अतूट पाठिंब्याबद्दल आणि प्रेमाबद्दल धन्यवाद. जय हिंद .”
ऋषभ पंत दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या दोन्ही सामन्यातील चार डावात फेल गेला. त्याची कामगिरी निराशाजनक राहिली. दोन्ही कसोटी मिळून त्याने फक्त 49 धावा केल्या. इतकंच काय तर गुवाहाटी कसोटी त्याची विकेट पाहून तळपायाची आग मस्तकात गेली. क्रीडाप्रेमींच्या मते चुकीचा फटका मारण्याचा नादात विकेट फेकली. गुवाहाटी कसोटीत ऋषभ पंतला ज्या पद्धताने बाद झाला त्यावर बरीच टीका झाली. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी तर प्रेक्षकांपेक्षा संघासाठी जास्त खेळले पाहिजे, असा टोमणा मारला.
