गुवाहाटी कसोटी पराभवानंतर टीम इंडियाचे चाहते संतापले, गौतम गंभीरविरुद्ध मैदानात घोषणाबाजी Video
भारताला दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. यानंतर चाहत्यांचा राग प्रशिक्षक गौतम गंभीरवर निघाला. मैदानातच त्यांनी गौतम गंभीरविरुद्ध घोषणाबाजी केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना भारताने हातातून घालवला. याला सर्वस्वी टीम इंडियाचे फलंदाज जबाबदार होते. त्यात दहा फलंदाज घेऊन खेळावं लागलं होतं. त्यामुळे पहिला कसोटी सामना भारताने 30 धावांनी गमावला. त्यानंतर दुसर्या कसोटी सामन्यात नव्या कर्णधारासह मैदानात उतरावं लागलं. त्यात भारताचा दक्षिण अफ्रिकेने दारूण पराभव केला. भारताला 408 धावांनी पराभूत केलं. त्यामुळे न्यूझीलंडनंतर भारतीय संघाला भारतातच क्लिन स्विप देण्यात दक्षिण अफ्रिकेला यश आलं. त्यामुळे सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली आहे. या टीकेचा धनी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरही ठरला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात पराभव होताच त्याच्याविरुद्ध मैदानातच चाहत्यांचा संताप झाला. गुवाहाटी कसोटीत पराभव झाल्यानंतर मैदानात त्याच्या विरोधात घोषणाबाजी झाली. एकीकडे घोषणाबाजी होत असताना गौतम गंभीर मात्र हाताची मागे ठेवून आणि मान खाली घालून मैदानात उभा होता.
प्रशिक्षक गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप जिंकला आहे. मात्र कसोटीत टीम इंडियाची कामगिरी हवी तशी झाली नाही. मागच्या पर्वात अंतिम फेरी गाठण्याची संधी गमावली होती. त्यानंतर चौथ्या पर्वातही अंतिम फेरीचं गणित बिघडलं आहे. गौतम गंभीर प्रशिक्षक असताना देशात झालेल्या दोन कसोटी मालिकेत टीम इंडियाला क्लिन स्विप मिळाला. न्यूझीलंडने भारताला 3-0 ने आणि दक्षिण अफ्रिकेने 2-0 ने पराभूत केलं आहे. गौतम गंभीरत्या कारकिर्दीत भारतीय संघ फक्त बांग्लादेश आणि वेस्ट इंडिजसारख्या कमकुवत संघाविरुद्धच चांगली कामगिरी करू शकला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही निराशा पदरी पडली होती. इंग्लंड दौऱ्यात मात्र मालिका बरोबरीत सोडवली होती.
🚨: Angry Fans chanted “Gautam Gambhir Hay Hay” in front of Gautam Gambhir after India’s embarrassing Test series loss at Guwahati stadium. pic.twitter.com/7gq4T1lq8j
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) November 26, 2025
गुवाहाटी कसोटीतील पराभवानंतर प्रशिक्षक गौतम गंभीर पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरं गेला. त्याने या पराभवासाठी संपूर्ण संघाला जबाबदार धरलं. ‘खरं तर आम्हाला रेड बॉल क्रिकेटमध्ये खूप सुधारणा करण्याची गरज आहे. मग ते मानसिक असो.. तांत्रिक असो.. दबाव सोसण्याची क्षमता असो.. झोकून देण्याची भावना असो किंवा टीमला स्वत:चा वर ठेवण्याची भावना असो. सर्वात महत्त्वाचं गॅलरीला खूश करण्यासाठी खेळायचं नाही. ‘ , असं गौतम गंभीर म्हणाला.
‘व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये धावा करताच लोकं कसोटीतील कामगिरी विसरून जातात. असं होता कामा नये. आम्हाला पुढे खूप सारं व्हाईट बॉल क्रिकेट खेळायचं आहे. यात कोणी 40 चेंडूत, 50 किंवा 80 चेंडूत 100 मारेल. पण खरं सांगायचं तर आम्ही रेड बॉल क्रिकेटमध्ये अधिक सुधारणा करण्याची गरज आहे.’, असंही गंभीर पुढे म्हणाला.
