
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. 15 सदस्यांची निवड केली असून राखीव खेळाडूंची घोषणा केलेली नाही. कारण हा वर्ल्डकप भारतातच होत असल्याने हा निर्णय घेतला आहे. विदेशात असता तर राखीव खेळाडूंची गरज तात्काळ भासू शकते म्हणून त्याची घोषणा केली जाते, असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. या संघातून शुबमन गिलला डावलण्यात आलं आहे. तर अक्षर पटेलच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची धुरा सोपण्यात आली आहे. अशी सर्व चर्चा रंगली असताना या संघात पहिल्यांदा टी20 वर्ल्डकप खेळणारे खेळाडू कोणते? तसेच गतविजेत्या संघात असलेल्या किती खेळाडू आहेत. याची चर्चा रंगली आहे. मागच्या वर्ल्डकप स्पर्धेतील सात खेळाडू या संघात आहे. तर पहिल्यांदाच टी20 वर्ल्डकप खेळणाऱ्या पाच खेळाडू आहेत. चला जाणून घेऊयात..
अभिषेक शर्मासह रिंकु सिंह हे पहिल्यांदाच टी20 वर्ल्डकप स्पर्धा खेळणार आहेत. अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकु सिंह, हर्षित राणा आणि वॉशिंग्टन सुंदर पहिल्यांदाच टी20 वर्ल्डकप खेळणार आहेत. त्यामुळे या खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्याची नामी संधी आहे. दुसरीकडे इशान किशन दोन वर्षानंतर टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळणार आहे. यापूर्वी इशान किशन 2021 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळला होता. त्यामुळे त्याला ही स्पर्धा काही नवी नाही.वरूण चक्रवर्तीच्या बाबतीतही असंच आहे. त्याने 2021 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळला आहे. या स्पर्धेत सर्वांच्या नजरा या ओपनर अभिषेक शर्मावर असतील.
गतविजेत्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील 7 खेळाडू या संघात नाहीत. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी टी20 वर्ल्डकप जेतेपदानंतर निवृत्ती घेतली. त्यामुळे त्यांच्या निवडीचा प्रश्नच येत नाही. या शिवाय चार खेळाडूंना यावेळी डावलण्यात आलं आहे. यात ऋषभ पंत, मोहम्मद सिराज, यशस्वी जयस्वाल, युजवेंद्र चहल यांना संघात स्थान मिळालं नाही. मागच्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत उपकर्णधारपदाची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर होती. मात्र यावेळी ही धुरा अक्षर पटेलकडे देण्यात आली आहे.