PAK vs USA : पाकिस्तानचा सलग दुसरा विजय, यूएसएवर 32 धावांनी मात, भारताला नुकसान

Pakistan vs United States of America Match Result : पाकिस्तानच्या फलंदाजांनी 190 धावा केल्यानंतर त्यांच्या गोलंदाजांनी चिवट बॉलिंग करत यूएसएला 158 धावांवर यशस्वीरित्या रोखलं. पाकिस्तानने अशाप्रकारे हा सामना जिंकला.

PAK vs USA : पाकिस्तानचा सलग दुसरा विजय, यूएसएवर 32 धावांनी मात, भारताला नुकसान
PAK vs USA Babar Azam
Image Credit source: Social Media
| Updated on: Feb 10, 2026 | 10:59 PM

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत पाकिस्तानने सलग दुसरा विजय मिळवत सुपर 8 फेरीसाठी दावा मजबूत केला आहे. पाकिस्तानने नेदरलँड्सनंतर यूएसएला पराभूत केलं आहे. पाकिस्तानने यूएसएसमोर 191 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. यूएसएने विजयी धावांचा पाठलाग करताना आश्वासक सुरुवात केली होती. त्यामुळे यूएसए 2024 नंतर पुन्हा एकदा पाकिस्तानला लोळवून उलटफेर करेल असं वाटत होतं. मात्र पाकिस्तानच्या गोलंदाजांसमोर यूएसएला 20 ओव्हरमध्ये 8 विके्टस गमावून 158 धावांपर्यंतच पोहचता आलं. पाकिस्तानने अशाप्रकारे आपला सलग दुसरा विजय नोंदवला. पाकिस्तानने या विजयासह 2024 च्या पराभवाची परतफेड केली. तर यूएसएचा हा सलग दुसरा पराभव ठरला.

पाकिस्तानसाठी साहिबजादा फरहान याने 73 धावा केल्या. बाबर आझम याने 46 धावांचं योगदान दिलं. तर शादाब खान याने 30 धावा जोडल्या. पाकिस्तानने या त्रिकुटाच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 190 रन्सपर्यंत मजल मारली.

यूएसएच्या अँड्रयू गोस आणि शायान जहांगीर या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी 42 धावा जोडल्या. मात्र अँड्रयू आऊट होताच ही जोडी फुटली. अँड्रयूने 13 धावा केल्या. कॅप्टन मोनांक पटेल याने निराशा केली. मोनांकने 3 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. शायान चांगला सेट झाला होता. त्यामुळे यूएसए हे आव्हान पूर्ण करेल, असं वाटत होतं. मात्र शायान आऊट झाला. शायानचं अर्धशतक अवघ्या 1 धावेने हुकलं. शायानने 34 बॉलमध्ये 49 रन्स केल्या.

चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी

त्यानंतर मिलिंद कुमार आणि शुभम रांजने या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 34 बॉलमध्ये 54 रन्सची पार्टनरशीप केली. या भागीदारीमुळे यूएसए सामन्यात कायम होती. मिलिंद कुमार 29 रन्स करुन आऊट झाला. त्यानंतर पाकिस्तानने यूएसएला ठराविक अंतराने झटके दिले. तसेच आव्हानही अवघड होतं. मात्र मुंबईकर शुभम रांजने याने एकट्याने किल्ला लढवला.शुभमने अर्धशतक ठोकलं. मात्र त्याला दुसऱ्या बाजूने आश्वासक साथ मिळाली नाही. त्यामुळे शुभमला टीमला जिंकवण्यात यश आलं नाही. शुभमने 30 चेंडूत 51 धावा केल्या.

पाकिस्तानचा विजय

पाकिस्तानची चिवट बॉलिंग

पाकिस्तानसाठी उस्मान तारीक याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. शादाब खान याने 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली. पाकिस्तानने या विजयासह ए ग्रुपमधील पॉइंट्स टेबलमध्ये टीम इंडियाला पछाडत पहिल्या स्थानी झेप घेतली. तर टीम इंडियाची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.